जितेंद्र कालेकर
ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींची संख्या ६९५ तर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची संख्या ६६४ इतकी लक्षणीय आहे. विशेष म्हणजे ३५ ते ४५ या मध्यमवयीन वयोगटातील आरोपींची संख्या मोठी म्हणजे १ हजार १८१ इतकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये सध्या २ हजार ५५७ बंदी असून यात २ हजार ३७१ पुरुष तर ११९ महिलांचा समावेश आहे. यामध्ये ६७ न्यायबंद्यांचा समावेश आहे. या कारागृहात अगदी चोरी, जबरी चोरी, दरोडा, खून, लैंगिक अत्याचार, बालकांवरील लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) आदी कलमांखाली अटकेतील न्यायालयीन कोठडीतील आरोपींपासून ते थेट मुंबई बॉम्बस्फोटातील कुख्यात आरोपी दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरपर्यंतचे गुन्हेगार आहेत.
यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील पुरुष ९७५ तर महिला ५० आहेत. मोठी संख्या ही मध्यमवयीन अर्थात ३५ ते ५५ वयोगटातील आरोपींची आहे. यात एक हजार ४०० पुरुष तर ६५ महिलांचा समावेश असून २७ न्यायबंदी आहेत. कारागृहात कैदी सुधारण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत असले तरी याठिकाणी चोरी, जबरी चोरी, दरोडे आणि फसवणुकीतील अनेक वेगवेगळे आरोपी एकत्र येतात. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा बाहेर गेल्यानंतर कशा प्रकारच्या गुन्हेगारी योजना आखायच्या याचीही खलबते होत असतात. अनेकदा, न्यायालयीन सुनावणीसाठी जाताना आणि येतानाही त्यांच्याकडून तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि घरच्या जेवणाची मागणी पोलिसांकडे होते. ते त्यांना नाकारल्यानंतर पोलिसांवरच हल्ला करण्यासही ते मागे पुढे पाहात नाही. ठाणे न्यायालयाच्या आवारातही काही दिवसांपूर्वी अशाच एका कैद्याने घरच्या जेवणासाठी बंदोबस्तावरील पोलिसांवर हल्ला केला होता.
कैद्यांच्या विकासासाठी कारागृह प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जातात. त्यांना व्यावसायिक कामे शिकवणे, त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला जातो. समाजात त्यांना पुन्हा स्वीकारले जावे, त्यांच्यात सकारात्मक विचार रुजावेत, यासाठी विविध उपक्रम कारागृहात राबविले जातात. अनेक कैदी कारागृहातून बाहेर पडल्यानंतर सन्मार्गाला लागल्याचीही अनेक उदाहरणे आहेत, असे ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
अत्याचाराचे गुन्हे अधिक लैंगिक, अनैसर्गिक अत्याचार व बालकांवरील लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कलमांखाली अटक झालेल्या पुरुष आरोपींची संख्या ६९५ तर, महिलांची संख्या ही २० आहे. एकूण ७१७ आरोपी केवळ लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन बंदी आहेत.
पैशांसाठी वाट्टेल ते सोनसाखळीसाठी एकाने आपल्याच मित्राचा खून केला. तर अन्य एकानेही ५०० रुपयांच्या उधारीसाठी चाकूने हल्ला करीत साथीदाराचा खून केला. कोट्यवधींच्या खंडणीच्या गुन्ह्यात दाऊदचा भाऊ इकबाल कासकरही या कारागृहात आहे.एका नगरसेवकाच्या पुत्राने मालमत्तेच्या वादातून त्याच्याच सावत्र भावाचा खून केला. त्याने साथीदाराच्या मदतीने हा खून केल्यानंतर मृतदेह ठाणे खाडीत फेकून दिला होता. आरोपीच्या साथीदाराला पकडल्यानंतर पोलिसांनी यातील खूनी आरोपीला अटक केली होती.
महिला कैद्यांच्या संख्येत वाढकाही दिवसांपूर्वी महिलांची कारागृहात मोजकीच संख्या असायची. आता अनेक गुन्ह्यांमध्ये महिलांचाही समावेश असल्यामुळे खून, फसवणूक, चोरी अशा अनेक गुन्ह्यातील ११९ महिला कारागृहात आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
पॅरोलवरील ९५० कैदी बाहेरसध्या कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील ९५० कैद्यांना पॅरोलवर सोडले आहे. हे कैदी येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा कारागृहात येणार आहेत.