मीरारोड - मीरा भार्इंदर मधील बहुतांशी पुर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक पर्यंतच्या शाळां मध्ये शासन आदेशा नुसार विद्यार्थ्यांसाठी तक्रारपेट्याच लावण्यात आल्या नसुन या प्रकरणी प्रशासनाने केवळ सुचनांचे सोपस्कार उरकले आहेत. विशेष म्हणजे या मध्ये पालिका शाळांचा देखील समावेश आहे.शाळांच्या दर्शनी भागात शाळा व्यवस्थापनाने तक्रार पेटी ठेवणे बंधनकारक आहे. या बाबत शासनाने तक्रार पेटी ठेवण्याचे मे २०१७ मध्ये आदेश दिले असुन या तक्रार पेट्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच विद्यार्थी व पालक प्रतिनिधी आणि पोलीस यांच्या समोर आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी उघडायच्या आहेत.विद्यार्थ्याांच्या आलेल्या तक्रारींवर सदर समितीने आवश्यक कार्यवाही करायची आहे. विद्यार्थी यांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार, दमदाटी, मारहाण आदी प्रकारच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी तसेच विद्यार्थी आदिंच्या अन्य प्रकारच्या तक्रारी समजुन घेण्यासाठी तक्रारपेट्या उपयुक्त ठरण्याची आशा आहे.परंतु शासन आदेशा नंतर देखील शाळां कडुन अशा प्रकारे तक्रार पेट्या लावण्यास टोलवाटोलवी केली जात आहे. शहरातील २२० प्राथमिक शाळां मध्ये ३६ शाळा ह्या महापालिकेच्या आहेत. त्या पालिकेच्या अखत्यारीत येतात. पण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मात्र ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागा कडे येतात.या प्रकरणी मनविसेचे शान पवार यांनी पालिका प्रशासनासह आपलं सरकार पोर्टल वर तक्रार चालवली होती. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख यांनी , तक्रार पेटी ठेवण्याच्या सुचना सर्व मुख्याध्यापकांना दिल्या असुन पेट्या लावल्या बाबत आढावा घेतला जाईल. ज्यांनी पेट्या लावल्या नसतील त्यांना तसे आदेश दिले जातील असे उत्तर दिले आहे.
शासन आदेशानंतर देखील बहुतांश शाळांमध्ये तक्रार पेट्या नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 8:05 PM