लोकमत न्यूज नेटवर्क
भातसानगर/शहापूर : दोन वर्षांच्या मुलीसह एका महिलेने रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना मध्यरेल्वेच्या आसनगाव स्थानकाजवळ शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. हेमांगी रेपे व संस्कृती रेपे अशी या मायलेकींची नावे असून त्या उल्हासनगर येथे राहणाऱ्या आहेत. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मध्यरेल्वेच्या आसनगाव स्थानकाजवळ अप सिग्नलजवळ शनिवारी साडेआठच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेससमोर आई हेमांगी रेपे (२८) यांनी मुलगी संस्कृती रेपे (२) हिच्यासह येऊन आत्महत्या केली, अशी माहिती कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली. एक्स्प्रेसच्या जोरदार धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दोघींचे शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.