- कुमार बडदे मुंब्रा : रविवारी सर्वत्र मातृदिन उत्साहात साजरा होत असताना, एका मुलीला मातृप्रेमापासून पारखे व्हावे लागले. नाशिक येथे राहणाऱ्या या एकुलत्या एक मुलीच्या ठाण्यातील वृद्ध आईने श्ोवटचा निरोप घेतला. दुर्दैव म्हणजे, लॉकडाऊनमुळे तिच्या मुलीला आईला मन भरुन बघताही आले नाही.ठाण्यातील दादा पाटील वाडी परिसरात राहत असलेले वृत्तपत्र विक्रेता तथा ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचे विभाग प्रमुख संदिप आवारे यांच्या आई ताराबाई आवारे (८0) यांना आठ दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. हे कळताच नाशिक येथे राहत असलेली त्यांची मुलगी सविता तिडके हिला धक्का बसला. आजारी असलेल्या आईशी मातृदिनानिमित्त गप्पा माराव्यात, या विचारत असतानाच सविताला आईच्या मृत्यूची बातमी कळली आणि डोळ्यांत अश्रू तरळले. आवारे कुटुंबीयांनी दुपारी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. सविता राहत असलेल्या भागातील पोलीस ठाण्यामधील पोलिसांनी अंतिम दर्शनासाठी ठाण्याला जाण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे देण्याची तयारी दर्शवली. परंतु लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने एवढ्या कमी वेळात ठाण्यात पोहचणे त्यांना शक्य नव्हते.आईची अंत्ययात्रा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मुलगी सवितासह इतर नातेवाइकांना दाखवण्याचा निर्णय घेऊन तशी व्यवस्था करण्यात आली. मोबाइलवर अंत्ययात्रा बघताच सविताच्या आसवांचा बांध फुटला होता, असे संदीप आवारे यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले.
मातृदिनीच घेतला आईने निरोप, लॉकडाउनमुळे मुलीला नाही घेता आले अंत्यदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 3:16 AM