ठाणे : स्वातंत्र्यदिन म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आणि सध्या गरज आहे ती करोना संकटापासूनच्या स्वातंत्र्याची आणि ते ही लवकरच मिळेल कारण प्रत्येक नागरिकांच्या रूपातून सैनिक कामं करत आहेत.
लॉकडाऊनमध्ये निसर्गाचा अनुभव घेण्याबरोबर झाडांनी, प्राणी पक्षांनी मोकळा श्वास घेतला. म्हणूनच निसर्गासोबत हा दिन साजरा करण्याची संधी आहे असा विचार करून ध्वजारोहणाच्या ऐवजी वृक्षारोपण करण्याचे मातृसेवा फाऊंडेशन संस्थेने ठरवले. झाडे लावा झाडे जगवा ’ या मोहिमेंतर्गत मातृसेवा फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील येऊर परिसरात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले.
गेल्या काही महिन्यांमध्ये या संस्थेने ठाणे, पनवेल, सिंधुदुर्ग येथे अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले. ठाण्यात मानपाडा येथे रस्त्याच्या कडेला देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.रोटरी क्लब ऑफ ठाणे वेस्ट ने ही ह्या वृक्षारोपण कार्यक्रमास मदत केली. पनवेल येथे आदिवासी पाड्यावर शेवग्याची लागवड केली. तर मातृसेवा संस्थेचे ट्रस्टी सुहास सामंत ह्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हायवे लगत 200 वृक्षांची लागवड केली.
संस्थेच्या सदस्यांचे म्हणणे आहे की नुसते वृक्षारोपण करून दुर्लक्ष करू नये. झाडांची निगा राखणेही तितकेच महत्वाचे आहे. जागेची पाहणी करून, पाण्याची सोय बघूनच आम्ही वृक्षारोपण करावे . आम्ही लावलेल्या प्रत्येक रोपाची वेळोवेळी पहाणी करून त्याची पुरेशी काळजी घेतो त्याला खत पाणी घालतो. ठाण्यातील महानगरपालिकेच्या शाळांत जाऊन आम्ही झाडांची ओळख, परसबाग, फुलपाखरू उद्यान असे उपक्रम राबवतो. कारण भावी पिढीला पर्यावरणाचे महत्व आत्ताच पटवून देणे गरजेचे आहे. गेली तीन वर्षे आम्ही रक्षाबंधनादिवशी आमचा वृक्षबंधन हा उपक्रम राबवतो. असे संस्थेच्या अध्यक्षा संध्या (सामंत ) सावंत म्हणाल्या.
देशभक्ती ही झेंड्यापुरती किंवा स्वातंत्र्यदिनापूर्ती मर्यादित नसावी तर ती प्रत्येक कार्यातून दिसली पाहिजे. स्वातंत्र्य दिनी धरती मातेसाठी वृक्षारोपण करण्याची भावना खूप चांगला संदेश देऊन जाते. मातृसेवा फाउंडेशन च्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. लवकरच आपले कोरोना संकट टळो आणि आपण सर्वजण पुन्हा पाहिल्यासारखे स्वतंत्र आयुष्य जगू शकू असा विश्वास आपल्यात राहूद्या.