कल्याण : पतीशी झालेल्या क्षुल्लक भांडणामुळे संतापलेल्या पत्नीने तीन मुलांना विष पाजून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी कातकरीपाड्यात घडली. यात महिलेसह दोन मुलांचा मृत्यू झाला. एका अत्यवस्थ मुलावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लक्ष्मी प्रदीप वाघे (२७), नाजुका (१०), वंश (७) यांचा यात मृत्यू झाला आहे, तर विशाल (१२) अत्यवस्थ आहे. मोहने-आंबिवलीतील कातकरीपाड्यात राहणारे प्रदीप वाघे मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. लक्ष्मीने सांगूनही प्रदीप बुधवारी मासेमारीसाठी नदीवर गेले नाहीत. त्यावरून दोघांत रात्री वाद झाला होता. उंदीर मारण्याचे औषध पाजले प्रदीप गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे मासे पकडण्यास नदीवर गेले. मात्र, रात्री झालेल्या भांडणाचा राग लक्ष्मीच्या मनात होता. त्यातून सकाळी ८ च्या सुमारास तिने तिन्ही मुलांना उंदीर मारण्याचे औषध दिले आणि स्वत:ही ते औषध घेतले. प्रदीप मासेमारी करून परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. लक्ष्मी, नाजुका आणि वंश यांचा रु ग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर विशाल बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुलांना विष पाजून आईची आत्महत्या
By admin | Published: October 28, 2016 12:58 AM