कल्याण : रिक्षांचे सर्वाधिक परवाने परप्रांतीयांना दिल्याचा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन रिक्षा जाळण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, त्यांनी हे आंदोलन मागे घेतल्याची घोषणाही केली. हे प्रकरण ताजे असतानाच कल्याणच्या भरवस्तीत असलेल्या सह्याद्रीनगर परिसरात वॅगन-आर मोटारीसह रिक्षा जाळण्याचा प्रकार शनिवारी पहाटे घडला. त्यामुळे परिसरात घबराट पसरली.बिर्ला कॉलेजसमोर राहणाऱ्या भगवान निकम यांचा उदरनिर्वाह रिक्षावर अवलंबून होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने त्यांची रिक्षा पेटवून दिली. सर्वत्र धूर पसरताच निकम व इतर रहिवासी घराबाहेर आले. त्या वेळी त्यांना रिक्षासह शेजारी अशोक गिरी यांची वॅगन-आर मोटारही जळत असल्याचे दिसले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीत निकम यांची रिक्षा संपूर्ण जळून खाक झाली, तर गिरी यांच्या मोटारीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, रिक्षा खाक झाल्याने निकम यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. या घटनेप्रकरणी निकम व गिरी यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)
कल्याणमध्ये मोटार, रिक्षा जाळली
By admin | Published: March 13, 2016 2:29 AM