- धीरज परब मीरा रोड : वापरलेल्या महागड्या विदेशी गाड्यांच्या विक्रीत अनेकांची फसवणूक केल्याबद्दल देशभरात गुन्हे दाखल असलेल्या वकील ऊर्फ राजू रामकरण मिश्रा (४६) याने स्वत:चाच सहकारी अजय ललित यादव (४०) विरुध्द एका मर्सिडिज गाडीचे पैसे न देता विक्री करुन फसवणूक केल्याचा गुन्हा भार्इंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. अगोदरच्या गुन्ह्यांमध्ये अजय व वकील एकत्र आरोपी आहेत. मिश्राने आतापर्यंत अनेक राजकारणी, व्यापारी आदी बड्या धेंडांना कोट्यवधी रुपयांना गंडवले आहे.गीता नगर फेज - ८ मध्ये राहणाऱ्या वकील मिश्राचे मीरारोडच्या क्वीन्स पार्क भागात पूजा आॅटो या नावाने गाड्यांच्या खरेदी - विक्रीचा व्यवसाय आहे. ठाण्याच्या संदीप नंदकुमार साळवी यांना त्याने मर्सिडिज मोटार ४५ लाखांना विकून देतो असे सांगितले. त्या गाडीचा सौदा मिश्राने काशिमीरा भागातील शिवसेनेचे अविनाश पाटील यांच्याशी केला. पाटील यांच्या खात्यातून साळवी यांच्या ओमकार कन्स्ट्रक्शनच्या खात्यात ७ लाख रुपयांचा धनादेश जमा झाला. उर्वरीत पैसे मिश्रा व त्याचा सहकारी यादव याला मानकुबाई चाळ, काशिमीरा नाका येथे दिल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. पैसे देऊनही गाडीची कागदपत्रे देत नसल्याने पाटील यांनी तक्रार केली. दरम्यान पाटील यांनी ती गाडी आपल्या नात्यातल्यांनाच दिली. आता मिश्रा याने सहकारी यादव विरोधातच नवघर पोलिसांकडे तक्रार दिली असून यादवने मर्सिडिजचे पैसे न देता ती परस्पर विकल्याचा गुन्हा दाखल केला. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी मिश्राच्या तक्रारीवरुन नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांना कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी यादव याला अटक केली असून मर्सिडिज जप्त केली आहे.>संगनमताची शक्यतावकील मिश्रा, अजय यादव यांनी अनेक राजकारणी, उद्योजकांना विदेशी बनावटीच्या गाड्या देतो, असे सांगून त्यांची फसवणूक केली असल्याने व त्यांची पूर्वपीठिका लक्षात घेता मिश्राने केलेली यादव विरोधातली फिर्याद हाही संगनमताचा भाग असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या दोघांच्या सखोल चौकशीची मागणी फसलेल्या ग्राहकांनी केली आहे.
मोटार विक्रीतील चोराच्या उलट्या बोंबा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 3:27 AM