लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मोटारसायकलची चोरी करून ती विनाहेल्मेट चालविणाऱ्या उमेश बैजनाथ ठाकूर (३८, रा. भाईंदर पाडा, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम (मूळ रा. झारखंड) याला ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी रंगेहाथ पकडले. विनाहेल्मेट जात असल्याचे ई-चालान मूळ मालकाच्या मोबाइल क्रमांकावर गेले. त्यानंतर ही मोटारसायकलच चोरीची असल्याचे उघड झाले. त्यानंतर भाईंदर पाड्यातून शाेध घेऊन चोरट्याला वाहतूक पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेऊन मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेेंद्र राठोड यांनी सोमवारी दिली.
ठाणे शहर वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, कासारवडवली वाहतूक विभागांतर्गत असलेल्या नागला बंदर पॉईंटवर १५ जून २०२४ रोजी रात्री ८ ते ९ या दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक योगेश सानप, हवालदार राजाराम जाधव, अंमलदार मंगेश काळे, जयदत्त मुंढे आणि सुनील पाटील हे वाहतुकीचे नियमन करीत हाेते. त्याचवेळी विना हेल्मेट जाणाऱ्या चालकावर त्यांनी फाेटाे काढून विदाउट हेल्मेटच्या एक हजाराच्या दंडाचे ऑनलाइन चालान केले. या चालनची माहिती मोटारसायकलच्या डाेंबिवलीतील मूळ मालकाच्या मोबाइलवर गेली. त्यावेळी मोटारसायकल २०२३ मध्ये चोरीस गेलेली असल्याने त्याने थेट डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.
त्यानंतर डोंबिवली पोलिसांनी ठाण्यातील कासारवडवली वाहतूक विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर ठाण्याच्या कासारवडवली वाहतूक शाखेच्या सानप यांच्या पथकाने भाईंदरपाडा, घोडबंदर रोड ठाणे पश्चिम परिसरात या मोटारसायकलचा आणि संबंधित संशयित चालकाचा शोध घेऊन त्यास मोटारसायकलसह ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने ही मोटार सायकल मानपाडा डोंबिवली परिसरातून आठ ते नऊ महिन्यांपूवी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही उल्लेखनीय कामगिरी करणारे सहायक पोलिस निरीक्षक सानप आणि त्यांच्या पथकाचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी अभिनंदन केले.