ठाणे : ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला मुख्य न्याय दंडाधिकारी समता चौधरी यांनी पाच महिन्याच्या सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयात भरवण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतेत त्याने कारागृहातून व्हिडिओ कॉन्स्फ्रिंगद्वारे गुन्हा कबूल केला होता.
मालेगावात राहणारा अब्दुल मो. साबीर अन्सारी आणि भिवंडी येथे राहणारा अयाजअली रहमतअली अन्सारी, रा. भिवंडी या दोघांनी ३ मार्च २०२३ रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात पार्क केलेली मोटर सायकल चोरी केली होती. ठाणे नगर पोलिसांनी त्या दोघांना १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी अटक केली होती. या आरोपाबाबत मुख्य न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत पॅनल समोर कारागृहाने उपलब्ध करून दिलेल्या व्हिडिओ कॉन्स्फ्रिंगच्या माध्यमातून आरोपी अब्दुल मो. साबीर अन्सारीशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी आरोपी माजीद याने मोटर सायकल चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला असता त्याला पाच महिन्याचा सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अयाजअली अन्सारी याला याआधीच या गुन्ह्यात दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली होती.