ठाणे : टेम्पोच्या धडकेमध्ये जॉन सायमन श्रीसुंदर (34, रा. शेलार पाडा, कोलबाड, ठाणे ) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी टेम्पो चालक नबीसाहब महंमद मुल्ला मोहमम्मद मुल्ला (29, रा. सानपाडा, नवी मुंबई, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
जॉन हे त्यांच्या मोटारसायकलीवरुन 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई ते नाशिकच्या दिशेने पूर्व द्रूतगती मार्गावरुन जात होते. त्याचवेळी मुल्ला याने त्याचा दुधाचा टेम्पो भरघाव वेगाने खोपट बाजूकडून वर्तकनगरच्या दिशेला जात असतांना जॉन यांच्या मोटारसायकलला कॅडबरी जंक्शनजवळ त्याची जोरदार धडक बसली. या धडकेमध्ये टेम्पोच्या चाकाखाली येऊन जॉन गंभीर जखमी झाले. त्यांना नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम. पी. सोनवणो, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद मोरे आणि बीट मार्शल पोलीस नाईक धुरी यांनी तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनास्थळी त्याच्या पॅन्टच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डच्या आधारे त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकाच्या स्वाधीन केला. तत्पूर्वी, त्याच्या मृतदेहाची जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आली. टेम्पोचालक नवीसाहब याच्याविरुद्ध कलम 279 आणि 304- अ , नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पेालीस निरीक्षक सोनावणो हे अधिक तपास करीत आहेत.