लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : थांबा... इथे झेब्रा क्रॉसिंग आहे, असे सांगत घोडबंदर रोड येथील दक्ष नागरिक गिरीश पाटील हे आनंदनगर सिग्नल येथे चालकांमध्ये जनजागृती करत आहेत. तिथे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे असणे आवश्यक असताना प्रशासनाने येथे पट्टेच आखले नाहीत. त्यामुळे खुद्द पाटील यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे.
पाटील यांचा फोटो ट्विटरवर व्हायरल झाला आहे. घोडबंदर रोड हायवेवर पाटील हे जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी झेब्रा क्रॉसिंग अगोदर वाहने उभी करण्याचे चालकांना सांगत आहेत. हायवेवर झेब्रा क्रॉसिंग पट्टेच दिसत नाहीत. गेले दोन महिने ते या ठिकाणी सकाळी ७:३० ते ८:३० यावेळेत उभे असतात. याआधी पाटील यांनी २०१८ पासून जनजागृती सुरू केली होती. परंतु, लॉकडाऊनमुळे जनजागृती करणे अशक्य होते. घोडबंदर रोड येथून वाहने अतिशय वेगाने जातात. सिग्नल लागल्यावर या वाहनांनी झेब्रा क्रॉसिंगआधी थांबणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहनचालकांनाही हे कळत नाहीत, असे पाटील यांनी सांगितले.
चालकांना आवाहनपाटील यांनी शरीरावर एक फलक लावला आहे. पुढील बाजूला फलकावर मराठीत, तर मागील बाजूला फलकावर इंग्रजीत त्यांनी ‘कृपया, वाहने झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबवा’ असे आवाहन करणारा मजकूर लिहिला आहे. यासंदर्भात वाहतूक पोलिसांनाही सांगितल्याचे त्यांनी सांगितले. ५० सेकंदांचा हा सिग्नल असून, पाटील हे सिग्नल लागल्यावर त्या ठिकाणी २५ सेकंद उभे राहतात. तो फलक वाहनचालकांच्या निदर्शनास पडेल, असे त्यांना दाखवतात. काहीजण नियम पाळतात, पण बसचालक, रिक्षाचालक आणि स्थानिक वाहनचालक हा नियम मोडतात असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.