ठाणे : गेल्या वर्षभराच्या कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेकजण योग करतात. पण ते नेमके कसे करावे किंवा त्याचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने ठाण्यातील संकल्प इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी, शिक्षक, पालक, संस्थाचालक यांनी योग विषयावर आधारित 'मोटू बना पतलू' हा मूक लघुचित्रपट बनवला आहे. चित्रपट महामंडळात ही कथा रजिस्टर आहे.
संकल्प इंग्लिश स्कूल या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वेळापत्रकात योगाची तासिका ठेवून योगाभ्यास अनिवार्य आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना घरी योग करण्याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. यातूनच शाळेने विद्यार्थी, शिक्षक, पालकांच्या सहभागाने योग विषयावर आधारित लघुपट यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित करायचे ठरवले होते. त्यातूनच हा मूक लघुचित्रपट तयार केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. ज्योती परब यांनी ही कथा लिहिली आहे.
शरीराचे वाढते वजन प्रत्येकासाठी अत्यंत धोकादायक असते. असे शरीर अनेक आजाराचे माहेरघर बनते. शिवाय अशी व्यक्ती समाजाच्या चेष्टेचा विषय बनू शकते. आजच्या जीवनशैलीने लहानपणापासून लठ्ठपणाचा विकार आपणास ग्रासू शकतो. परंतु डॉक्टरांचा योग्य सल्ला, पूरक आहार, खेळ व योगाच्या साहाय्याने लठ्ठपणा घालवू शकतो. असे सांगणारी ही कथा आहे.
माजी विद्यार्थिनीकडून दिग्दर्शन
कथेचे दिग्दर्शन याच शाळेची माजी विद्यार्थिनी साक्षी हिने केले असून ८ वीचा विद्यार्थी साईराज याने शूटिंग, एडिटिंग या बाजू सांभाळल्या आहेत. या शॉर्टफिल्ममध्ये प्रमुख भूमिकेत इयत्ता ७ वीचा विद्यार्थी ऋषभ कुडासकर व ओम राठोड असून शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व मुख्याध्यापकांनीही आपली भूमिका बजावली आहे.
विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी अत्यल्प खर्चात तयार केलेली व योग्य संदेश देणारी अशी शॉर्टफिल्म आहे. अनेकांच्या सहकार्यामुळे शॉर्टफिल्म अत्यल्प खर्चात झाली असे या या लघुचित्रपटाचे निर्माते व शाळेचे संस्थाचालक डॉ. राज परब यांनी सांगितले. आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था अध्यक्ष हेमंत नेहते यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. या प्रसंगी जयंत भावे, राजेंद्र गोसावी आणि डॉ. योगेश जोशी उपस्थित होते.