उल्हासनगर : साईशक्ती इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या चांदवानी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. वृद्ध वडील मंदिराचे सेवाधारी असल्याने व मृत दीपकची पत्नी बाहेर गेल्याने वाचली. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत चौघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बानामल चांदवानी हे पत्नी मोहिनी, विवाहित मुलगा दीपक, दिनेश, दीपक यांचा १७ वर्षाचा मुलगा पुनीत असे चौघे एकत्र राहत होते. तर दीपकची पत्नी दुसरीकडे राहण्यास गेली आहे. बानामल सतनाम साक्षी मंदिराचे सेवाधारी असल्याने शुक्रवारी मंदिरात गेले होते. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता मोहिनी, मुलगा दीपक, दिनेश व नातू पुनीत असे चौघेजण हॉलमध्ये बसले होते. त्यावेळी पाचव्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावर कोसळल्याने चौघांचा ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाला. इमारतीचा स्लॅब कोसळून कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती बानामल यांना मिळाल्यावर त्यांना मानसिक धक्का बसला. आमदार कुमार आयलानी यांच्यासह पोलीस, अग्निशमन, नातेवाईक आदी त्यांना धीर देत होते.
धोकादायक इमारतीच्या यादीत साईशक्तीचे नाव नव्हते असे सांगण्यात आले. शनिवारी सकाळी चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन, त्यांच्यावर मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चांदवानी बंधू लहान-मोठा व्यवसाय करीत होते. तर बानामल सतनाम साकी मंदिराचे सेवाधारी आहेत.
------------------------------------आयलानी यांचा आंदोलनाचा इशारा
शहरातील धोकादायक व जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणी बाबत राज्य सरकार वेळीच तोडगा काढत नसल्याने, आणखी किती जणांचे बळी घेणार? असे पत्र आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री यांना पाठविले आहे. नुसते आश्वासन न देता, यातून ठोस तोडगा काढल्यास इमारत दुर्घटनेत बळी गेलेल्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे ते म्हणाले. नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.