मीरा रोड : वरसावे शासकीय विश्रामगृहामागे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये डोंगर पोखरून रस्ता काढण्याचे काम सुरू आहे. येथील नैसर्गिक तलावामध्ये भराव करून सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. ठाणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा अहवाल सादर केला आहे.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीलगतचा परिसर हा इको सेन्सेटिव्ह झोन आहे. असे असताना दहिसर चेकनाक्यापासून मीरा, काशी, वरसावे, घोडबंदर, चेणे व काजूपाड्यापर्यंत राजरोसपणे बेकायदा खोदकाम, भराव, बांधकामे होत असताना वनविभाग केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम करत आहे. संनियंत्रण समितीसह जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिकासुद्धा या वाढत्या घटनांमुळे संशयाच्या भोवºयात आहे.वनक्षेत्रपाल डी.सी. देशमुख, वनपाल सुरेश पवार आदींनी गुरुवारी या परिसराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान वनहद्दीलगत इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून रस्ता बनवण्यासाठी दोन पोकलेनच्या साहाय्याने खोदकाम सुरू होते. खोदकामात निघालेले दगडमाती लगतच्याच नैसर्गिक पाणथळ (तलाव) भागात टाकून त्याला कुंपण करून सुशोभीकरणाचे काम केले जात होते, असे आढळून आले आहे. डोंगर फोडून हा रस्ता घोडबंदर मार्गाला जोडण्याचे काम सुरू असून त्यासाठीच्या खोदकामामुळे झाडांना धोका निर्माण झाला आहे. सुमारे ३०० मीटर लांब इको झोनमध्ये डोंगर खोदकाम केल्याचे सूत्रांनी सांगितले.बांधकाम थांबवण्याचे दिले निर्देशघटनास्थळी वनअधिकाºयांना दोन पोकलेनसह काही कर्मचारीसुद्धा काम करताना आढळून आले. ही जमीन सातबारा नोंदीवर चिंतामण वेलकर यांची असली, तरी सदरचे काम सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने साइट सुपरवायझर संदीप सुभाष घोडके, सी.एन. रॉक हॉटेलचे व्यवस्थापक भूपेंद्र सिंग व दिलीपसिंग यांच्या देखरेखीखाली सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे वनविभागासह आवश्यक परवानगी आढळून आली नाही. वनअधिकाºयांनी हे काम थांबवण्याचे निर्देश दिले असून संबंधितांवर वनकायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याबाबत उचित आदेश देण्याचा अहवाल देशमुख यांनी उपवनसंरक्षक यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होत असतानादेखील पर्यावरणाला मारक कामे करणाºयांना पाठीशी घालण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेमार्फत चालवले जात असून, यात राजकीय नेत्यांचेसुद्धा लागेबांधे यानिमित्ताने समोर येत आहेत.वनविभागाकडून वेलकर यांना मिळालेली १० एकर जमीन आम्ही विकत घेतली आहे. त्या जमिनीसाठी जाणारा रस्ता समतल करण्याचे काम करतोय. डोंगर फोडलेला नाही. आतील तलावाचे सुशोभीकरण केले आहे. कुठलेही बांधकाम केले नसून, त्यामुळे इको सेन्सेटिव्ह झोनच्या उल्लंघनाचा प्रश्नच येत नाही. येथील आदिवासी जमिनीवर अजमल नावाच्या इसमाने बेकायदा झोपडपट्टी उभारली होती. पालिकेने त्या झोपड्यांवर कारवाई केली, म्हणून खोट्या तक्रारी केल्या जात आहेत. - नरेंद्र मेहता, आमदार तथा संस्थापक, भागधारक, सेव्हन इलेव्हन कंपनी
रस्ता बांधकामासाठी इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये डोंगराचे बेकायदा खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:24 AM