उल्हासनगर : ऐन दिवाळीदरम्यान पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेतली. या प्रकाराला संबंधित खात्याचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याने विभागातील ९० कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस व वार्षिक वेतनवाढ थांबविण्याचा निर्णय घेतला. जर याची अंंमलबजावणी केली असती, तर कर्मचारी यांची दिवाळी अंधारात गेली नसती. या प्रकाराने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याने, अखेर हा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीपकुमार सोनवणे यांनी दिली.
उल्हासनगर पूर्वेतील पाणीपुरवठा ऐन दिवाळीदरम्यान विस्कळीत झाल्याने, नागरिक रस्त्यावर उतरले होते. तसेच मनसेने मराठा सेक्शन जिजामाता उद्यानाजवळ पाणीटंचाईच्या निषेधार्थ उपोषण केले होते. दरम्यानच्या काळात शहरातील इतर विभागातही पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या असंख्य तक्रारी आल्या होत्या. अखेर पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराची दखल आयुक्त डॉ. दयानिधी यांनी घेऊन विभागातील संबंधित ९० कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व वार्षिक वेतनवाढ थांबविण्याचा निर्णय घेतला. एमआयडीसीकडून अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होऊन जलवाहिनी फुटल्याने काही दिवसांपूर्वी टंचाई निर्माण झाली होती.
महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद कर्मचारी संघटनेत उमटून कर्मचारी नाराज झाले. दरम्यान, कार्यकारी अभियंता सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचा व वार्षिक वेतनवाढ न रोखण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतल्याची प्रतिक्रिया दिली. तर, मुख्य लेखाधिकारी विकास चव्हाण यांनी असे कोणतेही आयुक्तांचे पत्र आले नसल्याची माहिती दिली. तर, पाणीपुरवठा नियमित झाला नाहीतर मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता.