डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर खासगी शाळा आहेत. त्यातील बहुतांशी शाळा या इंग्रजी माध्यमांच्या आहेत. या शाळा दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेच जूनपासून नियमबाह्य फीवाढ करतात. कोणत्याही शाळेने नियमबाह्य फीवाढ केल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन केले जाईल, अशा इशारा केडीएमसीतील सभागृह नेते राजेश मोरे यांनी शाळांना दिला आहे.डोंबिवलीत ८५० हून अधिक खासगी शाळा आहेत. २७ गावांमध्येही खासगी शाळांची संख्या मोठी आहे. शाळा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मोठी फीवाढ करतात. अनेकदा शाळा पालकांना त्याची पूर्व कल्पनाही देत नाहीत. वाढीव रक्कमेमुळे पालकांना शॉक बसतो. पूर्णत: त्यांचे बजेट कोलमडते. शाळांच्या या मनमानीविरोधात कोणाकडे दाद मागावी, हे समजत नाही. केवळ मनस्तापाशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. त्यामुळे शिवसेनेने पालकांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले आहे. अवाजवी फीवाढीविरोधात शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. फीवाढीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षे धोक्यात येत असेल तर ते योग्य नाही. शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मुलभूत अधिकार आहे. तो त्यांना मिळायलाच हवा, असेही ते म्हणाले. फीबाबत कोणीही तक्रार असल्यास पालकांनी महापालिकेतील माझ्या कार्यालयात अथवा डोंबिवलीतील त्यांच्या दत्तनगरमधील जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.पालकांनी संघटीतपणे एकत्र यावे. त्यामुळे समस्या सोडवण्यासाठी संबंधित शाळा प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढता येईल. त्यानंतरीही शाळा प्रशासनाने ते मान्य न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
नियमबाह्य फीवाढ केल्यास आंदोलन
By admin | Published: May 03, 2017 5:25 AM