ठाणे : दान केलेल्या गणेशमूर्ती कचरा भरण्याच्या गाडीतून वाहून नेत असल्यामुळे त्यांची विटंबना होऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. त्यांची अशा प्रकारे होणारी विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यावर बंदी घालावी, यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदू जनजागृती समितीचे नरेंद्र सुर्वे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेव्दारे दिला.गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण, असे समीकरण जुळवून गणेशमूर्तींच्या परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेशमूर्तींचे दान करण्यास किंवा कोट्यवधी रु पये खर्चून बांधलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे. श्री गणेशाला देव म्हणून पुजूनही या गणेशमूर्ती घाणेरड्या खाणी, पडक्या विहिरी, खड्डे यामध्ये किंवा निर्जनस्थळी टाकल्या गेल्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला आहे. या वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अधिवक्ता चेतन बारस्कर, हिंदू महासभेचे अधिवक्ता जयेश तिखे आणि सनातन संस्थेच्या नयना भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचऱ्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी कृती केली जात नाही. मात्र, पालिका प्रशासन आणि ढोंगी पर्यावरणवादी आपल्या कृत्यावर पांघरूण घालून वर्षातून एकदाच येणाऱ्या गणेशोत्सवाला प्रदूषणास जबाबदार धरत असेल तर ते चुकीचे आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे मूर्तिदान आणि तिचे कृत्रिम तलावात विसर्जन या कृती बंद कराव्यात. धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे समुद्र, नदी वा वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी सूचना देण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.
कृत्रिम तलावांतील गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या बंदीसाठी आंदोलन
By admin | Published: September 07, 2015 10:52 PM