डोंबिवली : रामनगर पोलीस ठाण्याच्या आवारात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून परवानगी घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेनेही सकारत्मकता दाखवल्याने ते काम नियमानुसार सुरू झाले आहे.रामनगर पोलिस ठाण्याच्या आवारात टॉवर व त्याचा पाया बांधण्यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. मात्र या कामास ठाणे पोलीस आयुक्तालयाने हिरवा कंदील दिला होता. नगरसेवक मंदार हळबे यांनी त्यास आक्षेप घेत काम बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ते बंदही करण्यात आले होते. रस्ता रुंदीकरणात पोलिस ठाण्याची जागा जाणार आहे. असे असताना टॉवरसाठी परवानगी कोणी व कशी दिली असा सवाल हळबे यांनी केला होता. त्या कामाची पूर्ण चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे काम बंद ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे मागील आठवड्यात ते काम महापालिकेचे प्रकल्प उपअभियंता प्रशांत भुजबळ आणि प्रभाग अधिकारी मधुकर शिंदे यांनी बंद केले होते. या प्रकरणाची त्यांनी पूर्ण माहिती घेत संबंधित कंत्राटदाराशी चर्चा केली. त्यात या कामास पोलीस आयुक्तालयाची परवानगी आहे, मात्र महापालिकेची नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार संबंधितांनी तत्काळ महापालिकेच्या नगररचना विभागाकडे अर्ज केला. तसेच रस्त्यासाठी मार्किंग केलेली जागा सोडून उर्वरित भागात काम केल्याचे निदर्शनास आले आहे. (प्रतिनिधी)
मोबाईल टॉवरच्या परवानगीसाठी हालचाली
By admin | Published: March 23, 2016 2:09 AM