ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वेबिनार महासभेत प्रशासनाच्या विरोधात बोलणाऱ्या नगरसेवकांचा आवाज म्यूट केला जातो; विरोधी पक्षनेत्यांना पोलीस बळाचा वापर करून ताब्यात घेतले जाते. एकूणच ठामपामध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता सातपुते आणि फरझाना शाकीर शेख यांनी गुरुवारी आयुक्तांसमोर आंदोलन केले.
‘उल्टा चोर, कोतवाल को डाटे’ असे लिहिलेला बॅनर घेऊन सुनीता सातपुते आणि फरझाना शाकीर शेख यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या दालनासमोर आंदोलन केले. कोरोनाच्या नावाखाली वेबिनार महासभेचे आयोजन करण्यात येते. ही महासभा म्हणजे प्रशासनाच्या हातातील बाहुले आहे. जे नगरसेवक प्रशासनाला टार्गेट करतात, त्या नगरसेवकांचा आवाज म्यूट करण्यात येत असतो. त्यामुळे प्रभागातील समस्या सभागृहापुढे मांडताच येत नाहीत. चक्रीवादळानंतर शहरात अनेक झाडे उन्मळून पडली. मात्र, त्यांचा कचरा उचलला जात नाही. त्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांना पोलिसांच्या साह्याने ताब्यात घेऊन महासभेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आम्ही ही हुकूमशाही सहन करणार नाही, असे म्हणत त्यांनी घोषणाबाजी केली.