ठाणे : २०१७ च्या निवडणुकीत दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण न झाल्याने ठाणेकर नागरिकांची फसवणूक झाली आहे. ती करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ मंगळवारी ठाणे महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठाणे वेल्फेअर सोसायटी या सामाजिक संस्थेने निदर्शने केली. या वेळी “फसवले फसवले - ठाणेकरांना फसवले”, “दिलेले आश्वासन पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा”, “५०० चौरस फुटांच्या घरांची करमाफी झालीच पाहिजे,” अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. तसेच यापुढे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गल्लोगल्ली जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला.
संस्थेचे अध्यक्ष ॲड. अल्पेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी हातात बॅनर घेऊन २० ते २५ ठाणेकरांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
लवकरात लवकर ठाणेकरांना ही करमाफी लागू करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले आहे. एकीकडे बिल्डरांना मेट्रो सेस माफ केला जातो. मात्र, ठाणेकर नागरिकांना कररूपी भुर्दंड टाकणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात यापुढे अशीच गल्लोगल्ली आंदोलने करण्यात येणार असल्याचे कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.