लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : केडीएमसीतील ठोकपगारी वाहनचालकांना तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला होता. परंतु, प्रशासनाने मंगळवारी वेतन दिले जाईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्तास स्थगित केले होते. मात्र, त्यानंतरही वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून हे आंदोलन अटळ असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आयुक्तांची स्वाक्षरी न झाल्याने वेतन देता येत नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, स्वाक्षरीसाठी मंगळवारी तेथील अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. शहरस्वच्छतेच्या घसरलेल्या मानांकनावरून सध्या सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने ओला आणि सुका कचरा वर्गीकरणावर भर देण्याच्या दृष्टीने प्रबोधनाचे धडे नागरिकांना देण्यास सुरुवात केली गेली असताना दुसरीकडे ठोकपगारी वाहनचालकांना प्रशासनाकडून न्याय मिळणार तरी कधी?, असा सवाल उपस्थित होत आहे. केडीएमसी प्रशासनाने अॅन्थोनी वेस्ट हॅण्डलिंगचे कचरा गोळा करण्याचे दिले कंत्राट संपल्यानंतर २०११-१२ मध्ये ठोक पगारी तत्वावर १०५ वाहनचालकांना घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नेमण्यात आले. त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाते. परंतु, त्यांचा मुदतवाढीचा प्रस्ताव वेळेवर महासभेकडे पाठविला न गेल्याने दोन महिने हे वाहनचालक वेतनापासून वंचित राहिले होते. मात्र जूनमधील स्थगित महासभेत त्यांच्या मुदतवाढीला मान्यता मिळाली आहे. परंतु, याची अंमलबाजवणी आजवर न झाल्याने उपासमारीचे संकट त्यांच्यावर कायम आहे. आयुक्त पी. वेलरासू हे सध्या प्रशिक्षणासाठी मसुरीला गेले आहेत. सध्या त्यांचा अतिरिक्त कार्यभार नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त एन. रामास्वामी यांच्याकडे सोपवला आहे. परंतु, या महिनाभरात ते जेमतेम दोनवेळाच केडीएमसीत आले आहेत. त्यामुळे येथील कारभाराचे चांगलेच तीनतेरा वाजले आहेत. आयुक्तांच्या स्वाक्षरीविना वाहनचालकांचे वेतनही रखडले आहे. सोमवारी वेतन होईल, या प्रशासनाच्या आश्वासनानंतरही वेतनासाठी परवड कायम राहिल्याने बुधवारपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्णय वाहनचालकांनी घेतला आहे.
‘त्या’ चालकांचे आजपासून आंदोलन?
By admin | Published: June 28, 2017 3:12 AM