ठाणे: विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा खेळ बंद पाडण्यासाठी गेल्यानंतर एका प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे माजी गृहनिर्माणमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्त्यांविरुद्ध ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
माजीवडा येथील रहिवाशी परीक्षित धुर्वे यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. धुर्वे यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, ते त्यांच्या पत्नीसह ‘हर हर महादेव’ हा सिनेमा पाहण्यासाठी ७ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री विवियाना मॉलमध्ये सिनेमागृहात गेले होते. त्यावेळी सिनेमा चालू असताना रात्री ९.५५ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे माजी मंत्री आव्हाड हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह चित्रपट बंद पाडण्यांच्या उद्देशाने सिनेमागृहात शिरले. त्यांनी या ‘चित्रपटामध्ये चुकीचे दृश्य दाखविले जात असल्याने हा चित्रपट बंद करा’ असे बोलून चित्रपट बंद पाडला.
त्यावेळी चित्रपट पाहणाऱ्यांपैकी एका अनोळखी प्रेक्षकाने ‘असे कसे कोणीही ऐरा गैरा येईल आणि चित्रपट बंद पाडेल’ असे बोलला. त्याचाच राग मनात धरुन चित्रपट बंद पाडण्यासाठी आलेल्या या कथित आक्रमक कार्यकर्त्यांपैकी काहीजण चित्रपट पाहणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून आले. तेव्हा परिक्षित आणि त्यांची पत्नी हे अग्रभागी असल्याने जमावातील आठ ते दहा लोकांनी या दोघांना धक्का बुक्की करून ठोश्या बुक्याने मारहाण केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
परिक्षित यांनी आपल्यावर गुदरलेल्या या प्रसंगाची वर्तकनगर पोलीस ठाण्यात ८ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम, महादेव कुंभार, भरत चौधरी आदींनी भेट देऊन पाहणी केली. महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एस. शेट्टी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. यातील आरोपींना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.