डोंबिवली : शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता महापालिकेच्या आरोग्य विभागाने शास्त्रीनगर येथील सुरू असलेले आणि पूर्वेकडील स.वा. जोशी शाळेचे नियोजित कोविड लसीकरण केंद्र अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजवणी सुरू केली आहे. त्याजागी कोविड सेंटर सुरू करून रुग्णांना दाखल करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
शास्त्रीनगर येथील लसीकरण केंद्र बंद झाले असून, ते अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. जोशी शाळेत नियोजित होते, त्यामुळे तेथील केंद्राचा प्रारंभ झाला नव्हता; पण नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नोंद केल्याची माहिती माजी नगरसेविका खुशबू चौधरी यांनी दिली. त्यांच्या पत्रानुसार आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केंद्र मंजूर केले होते. आता ती जागा काही दिवसांत तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यावर कोविड सेंटर म्हणून सुरू करण्याचा मानस असल्याचे चौधरी यांनी सांगितले. त्यातच तीन दिवसंपासून राजाजी पथ येथील आदर्श शाळेत, तसेच शिवमंदिर पथ येथील हिंदी शाळेत सुरू असलेले लसीकरण केंद्र हेही लस उपलब्ध नसल्याने बंद होते. शहरात नेमके कुठे लसीकरण सुरू आहे याचा शोध नागरिक घेत आहेत. शास्त्रीनगर येथील लसीकरण केंद्र बंद झाल्यावर तेथून जवळ असलेल्या स्वामी विवेकानंद शाळेच्या राणाप्रताप भवन येथे केंद्र सुरू झाले. सोमवारी त्याठिकाणी २०० नागरिकांना लस देण्यात आली.