कल्याण, दि. 27 - कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणांना अचानक भेटी देणे सुरू केल्यामुळे कामचुकार अधिकारी आणि ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.गेल्याच आठवड्यात खा. डॉ. शिंदे यांनी याच रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवण्याच्या कामात हयगय करणाऱ्या तसेच निकृष्ट दर्जाचे सामान वापरणाऱ्या ठेकेदाराचे काम थांबवले होते. त्यानंतर आज बुधवार, २७ सप्टेंबर रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा याच रस्त्याची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर अनियमितता समोर आली आहे.चक्की नाका ते मलंग गड या रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि डागडुजीचे काम सुरू असून त्याबाबत नागरिकांच्या काही तक्रारी प्राप्त होताच खा. डॉ. शिंदे यांनी बुधवारी अचानक या कामाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान विकासक, व्यावसायिक व महापालिकेचे अधिकारी यांची अभद्र युती समोर आली आहे. सदर रस्त्यामुळे अधिक नागरिक बेघर होत होते. परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे व स्वतः खासदार डॉ. शिंदे यांनी याबाबत मध्यस्थी करून नागरिकांना आवाहन करून कमीत कमी कुटुंब बाधित होतील, अशा प्रकारे तोडगा काढला. परंतु महापालिका अधिकाऱ्यांनी प्रस्तावाप्रमाणे रस्त्याची लांबी न घेता अनेक विकासकांची अनधिकृत बांधकामे व अनेक व्यावसायिकांची अनधिकृत दुकाने यावर कारवाई होऊ नये म्हणून मोजमापच चुकीचे केले असल्याचे आजच्या पाहणीत निदर्शनास आले.या सर्वांचा मनस्ताप हा येथील नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी खा. डॉ.शिंदे यांच्यासमोर मांडल्या. यासंदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेऊन अनधिकृत बांधकामांवर करवाई करून संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारावर त्वरित कडक कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.या रस्त्यावर अनेक ठिकाणी प्रथम खड्डे भरून घेण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्या कामाला आजही सुरुवात झाली नसल्याचे आज उघड झाले. अनेक ठिकाणी तर मातींनीच खड्डे भरल्याने चिखल झाला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेब्रिज पडले आहे त्यातून वाट काढत नागरिकांना चालावे लागते, याची गंभीर दखलही खा. डॉ. शिंदे यांनी घेतली आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची पुन्हा रस्त्यांच्या कामाची पाहणी, कामचुकार अधिकारी आणि ठेकेदारांचे दणाणले धाबे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 8:09 PM