ठाणे : येथील सिव्हिलसह जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये आदी आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये विविध सोयीसुविधांची गरज आहे. याकडे लक्ष केंद्रित करून जिल्ह्यातील तब्बल दहा रुग्णालयांत वैद्यकीय साहित्यांसाठी ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे सदस्य कुमार केतकर यांनी आपला अडीच कोटी रुपयांचा खासदार निधी दिला आहे. तसे पत्रच त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे शुक्रवारी दिले.
ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये विविध सोयीसुविधांची वानवा आहे. त्या संदीप आचार्य व विकास नाईक यांनी केतकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. कोरोनाच्या या कालावधीतील रुग्णालयांच्या सुविधांचे गांभीर्य लक्षात घेऊन केतकर यांनी त्यांच्या खासदारकीच्या निधीपैकी अडीच कोटींचा निधी जिल्ह्यातील या दहा रुग्णालयांसाठी दिला आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देतेवेळी ठाणे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार उपस्थित होते.
प्रारंभी अवघ्या २५ लाखांचा निधी देण्याची तयारी खा. केतकर यांनी दर्शवली होती. मात्र, डॉ. पवार यांच्यासह आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांच्या गरजा लक्षात घेऊन प्रस्ताव तयार करून त्याकडे खा. केतकर यांचे लक्ष वेधले होते. त्यावर त्यांनी लगेच अडीच कोटींचा निधी देण्याची सहमती दर्शवून तसे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले. कोरोनाकाळात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देणारे केतकर हे एकमेव खासदार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. अन्य खासदारांनीही आपला निधी कोरोनाच्या या कालावधीत सामाजिक बांधिलकी म्हणून दिला तर राज्यातील शासनाच्या अनेक रुग्णालयांना मोठी मदत होईल, अशी अपेक्षा प्रशासकीय पातळीवर व्यक्त केली जात आहे.
-------------
कँप्शन- जिल्ह्यातील दहा रुग्णालयांच्या सोयीसुविधा व वैद्यकीय साहित्यांसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे सहमती पत्र ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे देताना ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांच्यासह अन्य अधिकारी.