मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या चौक डोंगरावरील धारावी किल्याच्या संवर्धन आणि पुनर्विकासासाठी शासनाकडून मोठी मदत होणार असून त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आश्वस्त केल्याची माहिती खासदार राजन विचारे आणि आमदार गीता जैन यांनी किल्ल्याच्या पाहणी दौऱ्यादरम्यान दिली आहे.
भाईंदर पश्चिमच्या चौक किनारपट्टीवरील ऐतिहासिक धारावी किल्ला असून गेल्या अनेक वर्षांपासून हा किल्ला दुर्लक्षित होता. या ठिकाणी किल्ल्याच्या मोठ्या संरक्षक भिंती तोडण्यासह भिंत व बुरुजाचे दगड नेण्याचे प्रकार पूर्वी घडल्याचे सांगितले जाते. सदर ठिकाणी मद्यपींची वर्दळ वाढली होती. दरम्यान गडप्रेमी तरुणांनी गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यासह किल्ल्याच्या संवर्धन व पुनर्विकासाची मागणी चालवली होती.
शनिवारी विचारे आणि जैन यांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले, स्थानिक नगरसेविका हेलन गोविंद, शर्मिला गंडोली, माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद, गडप्रेमी, पालिका अधिकारी यांच्या समवेत किल्ल्याची पाहणी करण्यात आली. धारावी किल्ल्याच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. किल्ल्यासाठी निधी आणि आवश्यक परवानग्या मिळण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे विचारे व जैन यांनी यावेळी सांगितले.
२०२० मध्ये स्थानिक नगरसेविकेच्या मागणी नंतर किल्ल्याकडे जाणारा रस्त्याचे काम जिल्हा नियोजन निधीतून २२ लाख रुपये खर्चून करण्यात आल्याचे विचारे यांनी सांगितले. पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे धारावी किल्ल्यास लवकरच भेट देण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली.