मीरारोड - एक्स्प्रेस इन-फाऊंटन हॉटेल समोरील घोडबंदर मागार्वरच्या सर्व्हिस मार्गाचे काम सुरु झाले असून वरसावे पूल व संलग्न रस्त्यांच्या कामांचा आढावा खासदार राजन विचारे यांनी घेतला. यावेळी २० फेब्रुवारी पर्यंत मुंबई - सुरत महामार्गावरील नवीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचे आश्वास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आले .
गेल्या अनेक वर्षापासून वरसावे येथील खाडी वरच्या जुन्या पुलांची दुरावस्था वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरली आहे. यामुळे वरसावे नाका परिसर नागरिकांच्या नाराजीचा मोठा केंद्रबिंदू ठरला आहे. खासदार राजन विचारे यांनी या पुलाच्या व परिसरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. कामचन्ह आढावा घेतला.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी मुकुंदा अत्तरडे, वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त प्रकाश गायकवाड, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कांबळे, उप अभियंता सुरेश परदेशी, माजी गटनेत्या नीलम ढवण सह शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे , शहर प्रमुख लक्ष्मण कंदळगावकर, जयराम मेसे, शिवशंकर तिवारी, जितेंद्र पाठक, ग्राहक कक्षाचे सदानंद घोसाळकर आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील वरसावे येथील धोकादायक झालेल्या पुलाची तात्पुरती डागडुजी करून त्याठिकाणी ९७० मी. लांबीचा ४ लेन असलेल्या नवीन पुलाचे काम पूर्णत्वास येत आहे. त्याठिकाणी फक्त पूल जोडण्याचे काम बाकी आहे. एकूण मार्ग २.२५ किमीचा आहे. या पुलाच्या कामाचे जानेवारी २०१८ मध्ये भूमिपूजन होऊन सुद्धा या कामास सुरुवात करण्यात आली नव्हती. त्यासाठी वन खात्याच्या परवानग्या मिळवून घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन व संसदेत सतत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार सुरु होता.
एप्रिल २०१९ रोजी वन खात्याच्या अंतिम परवानग्या प्राप्त झाल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली . पॅसेंजर कार युनिट च्या अहवालानुसार या मार्गावरून दररोज सव्वा लाख गाड्या ये-जा करीत आहेत. त्यामुळे नवीन पूल व रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे जेणे करून मुंबई, ठाणे तसेच सुरतकडे जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळून त्यांचा प्रवास सुखकर होईल यासाठी प्रयत्न सुरु होते अशी माहिती विचारे यांनी दिली.
फाऊंटन हॉटेल समोरील सर्व्हिस रोड एम एस आर डी सी कडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाल्या नंतर या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून निधी मिळवून दिला व त्याचे आत्ता काम सुरु झाले असून येत्या ६ महिन्यात या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे असे विचारे म्हणाले.