जव्हार : पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाड्यांवर अद्यापही रस्ते पोहोचलेले नाहीत. तेथील आजारी रुग्णांना डोलीत बसवून रुग्णालयांत न्यावे लागते. या पार्श्वभूमीवर ‘खेडोपाड्यांत रुग्णांचे हाल’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध करताच पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी डोंगरमाथ्याची वाट तुडवीत अखेर त्या आदिवासी पाड्यांना स्वत: भेट दिली व तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून डोंगरदऱ्याखोऱ्यांत वसलेले दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, भाटीपाडा, कुकडी या आदिवासी पाड्यांतील रस्ते पुढच्या वर्षापर्यंत करणार असल्याचे आश्वासन या वेळी खासदारांनी दिले. त्याचबरोबर येथील आदिवासींना रोजगाराच्या सुविधादेखील उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, वनविभागाकडून या रस्त्यासाठी सर्र्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे उपवनसंरक्षक अमित मिश्रा यांनी सांगितले. या वेळी राज्य चर्मकार समितीचे सदस्य विनीत मुकणे, शिवसेनेचे नेते श्रावण खरपडे, तहसीलदार बाळा भला, गटविकास अधिकारी समीर वठारकर, नायब तहसीलदार पाटील, अमोल चौधरी सहायक अभियंता जव्हार, एकनाथ दरोडा, अध्यक्ष युवा बहुजन विकास आघाडी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. या गावपाड्यांना भेट देऊन येथील रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदारांनी आश्वासन दिल्याने येथील आदिवासींनी गावितांचे आभार मानले.
डोंगरमाथ्याची वाट तुडवत खासदार आदिवासी पाड्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 1:36 AM