लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानकातील विकासकामांची आणि प्रलंबित कामांची पाहणी करण्यासाठी खा.डॉ. श्रीकांत शिंदे हे शनिवारी अंबरनाथमध्ये आले होते. त्यांनी रेल्वेने प्रवास करीत अंबरनाथ स्थानक गाठले. तसेच अधिकाऱ्यांसह स्थानकातील प्रलंबित कामांची पाहणी केली.
लॉकडाऊनमध्ये अंबरनाथ रेल्वे स्थानकातील विकासकामांना खीळ बसली होती. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नवीन पादचारी पूल आणि होम प्लॅटफॉर्मच्या कामाला गती दिली होती. अंबरनाथ रेल्वे स्थानकातील मध्यभागी नव्याने पादचारी पूल उभारण्यात आला असून, तो पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच होम प्लॅटफॉर्मचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकातील सुरू असलेल्या विकासकामांबाबत माहिती घेण्यासाठी आणि प्रस्तावित कामांचा अहवाल तयार करण्यासाठी खासदार शिंदे यांनी आज अंबरनाथ रेल्वे स्थानकाला भेट दिली. या भेटीदरम्यान खासदार स्वतः रेल्वेने प्रवास करून अंबरनाथपर्यंत आले. त्यानंतर स्थानकाची पाहणी करीत असताना प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांना दिला. तसेच होम प्लॅटफॉर्ममध्ये काही तांत्रिक सुधारणा करण्याबाबतदेखील सूचना दिल्या.
-------
दोघे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर
खासदार रेल्वे स्थानकावर येणार असल्याने शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आ.डॉ. बालाजी किणीकर हे दोघेही रेल्वे स्थानकात उपस्थित होते. मात्र हे दोन्ही दिग्गज नेते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर उभे असल्याने शिवसेनेतील अंतर्गत नाराजी या पाहणी दौऱ्यादरम्यानदेखील सर्वसामान्यांना दिसून आली. अखेर खासदारांनी सर्वांना सामावून घेत हा पाहणी दौरा पूर्ण केला.