मीरारोड - वरसावे खाडी पूलच्या वसई दिशेकडील मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या काही दिवसां पासून सलग पाण्याखाली जात असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे . ह्या भागात भरणी माफियांनी घातलेला धुमाकूळ व भरणी करून झालेली बेकायदा बांधकामे राष्ट्रीय महामार्गाच्या जलसमाधीला कारणीभूत असताना प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली बद्दल खासदार राजेंद्र गावित यांनी पोलीस आयुक्तांच्या बैठकीत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली . १५ दिवसात भरणी माफिया आणि बेकायदा बांधकामे करणाऱ्यांवर कारवाई करून महामार्गावरील पाणी साचण्याची समस्या सोडवा अन्यथा संसदेत आवाज उठवू असा इशारा गावित यांनी दिला आहे . तर पोलीस आयुक्तांनी भरणी माफियांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत .
वसईच्या हद्दीतील ससुनवघर भागातला महामार्ग हा पहिल्याच पावसात पाण्यात गेला आहे . गेले काही दिवस पाणी साचून असल्याने वाहतूक ठप्प होऊन वाहुनी चार चार तास अडकून पडत आहेत . गेल्या काही वर्षां पासून हि समस्या उद्भवली असताना संबंधित प्रशासन सातत्याने सांगून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संताप खा . गावित यांनी व्यक्त केला . त्यांच्या मागणी वरून शुक्रवारी सायंकाळी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मीरारोड येथील आयुक्तालयात बैठक झाली .
यावेळी पोलीस आयुक्त मधुकर पांडे, वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, परिमंडळ २ व ३ चे पोलीस उपायुक्त , वसईचे प्रांताधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार अविनाश कोष्टी , महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पाऊस सुरु झाल्या पासून महामार्गावरील ससूनवघर,किनारा धाबा, नालासोपारा फाटा, विरार फाटा येथे गुडघ्या इतके पाणी साचून १८ पेक्षा जास्त वाहने बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत . महामार्ग पाण्यात बुडाल्याने वाहने व त्यातील प्रवाशी अडकून पडले व वाहनांच्या पाच किलोमीटर अंतरा इतक्या रांगा लागल्या होत्या असे सांगत महामार्ग प्राधिकरणाच्या चिटणीस यांच्यावर खा . गावित संतप्त झाले . महामार्ग प्राधिकरणाने पाणी जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत , खड्डे बुजवले नाहीत त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करू अशी तंबी चिटणीस यांना दिली .
घोडबंदर, चिंचोटी, मनोर, कासा, तलासरी येथील महामार्गावर प्रत्येकी एक अशा पाच रुग्णवाहिका ठेवा , ४० टन वजन उचलण्याची क्षमता असलेले क्रेन, अग्निशमनची गाडी ठेवण्यास चिटणीस यांना सांगितले . तर वसई महापालिका व महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले .
खासदारांच्या तंबी नंतर शनिवारी प्रशासनाने मोठ्या भरावातून पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले खोदण्यास सुरवात केली आहे . तर येथील बेकायदा भरणी बंद करून झालेली भरणी व बेकायदा बांधकामे काढण्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई प्रशासन करणार का ? या कडे लक्ष लागले आहे .
राष्ट्रीय महामार्गाला जलसमाधी कशी व कोणा मुळे ? ससुनवघर येथे एका बाजूला वसईची खाडी आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय वन उद्यानच्या डोंगर रांगा आहेत . पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी हे पूर्वी नैसर्गिक ओढ्यातून परिसरातील कांदळवन , पाणथळ , सीआरझेड क्षेत्र मध्ये साचून नंतर खाडीत जायचे . परंतु गेल्या काही वर्षात काही स्थानिक भरणी माफिया व जमीन मालकांनी संगनमत करून ह्या क्षेत्रात असलेले मोठ्या प्रमाणातील कांदळवन , पाणथळ , सीआरझेड क्षेत्र , इको सेन्सेटिव्ह क्षेत्र नष्ट करून प्रचंड प्रमाणात बेकायदा भराव चालवले आहेत .
मोठ्या प्रमाणात भराव होऊन कच्ची - पक्की असंख्य बेकायदा व्यावसायिक बांधकामे बांधली गेली आहेत . त्यात नैसर्गिक ओढे व खाडीची आत येणारी पात्रे नष्ट केली वा अरुंद केली आहेत . त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने महामार्ग पाण्यात बुडतो . देशाचा महत्वाचा असलेला राष्ट्रीय महामार्ग पाण्यात बुडत असल्याची कारणे माहित असून देखील महसूल , वन , महापालिका , पोलीस , महामार्ग प्राधिकरण विभाग सह स्थानिक राजकारणी यांनी अर्थपूर्ण कानाडोळा चालवला . त्यामुळेच गेल्या काही वर्षात येथील परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे .