कल्याण : मागील आठवड्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीचा फटका उल्हास नदीलगतच्या म्हारळ, वरप आणि कांबा परिसरातील नागरिकांना बसला आहे. त्यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना मदत देण्यात आली.
वरप, कांबा आणि म्हारळ या भागातील दोन हजार नागरिकांना सोमवारी सायंकाळी कृष्णा रेसिडेन्सीच्या आवारात जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. चटई, अंथरूण, बेडशीट, टॉवेल, ब्लँकेट, अन्नधान्याचे कीट देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगर शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे उपस्थित होते.
अतिवृष्टीचा फटका कोकणाप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनाही बसला आहे. सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे शिवसेना त्यांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. संकट कोणतेही असो मदतीसाठी शिवसेना सदैव पुढे असते. पूरग्रस्त नागरिकांच्या नुकसानभरपाईचे पंचनामे तहसील कार्यालयाकडून सुरू करण्यात आले आहे. सरकारकडूनही पूरग्रस्तांना मदत दिली जावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
--------------