ठाणे : गेले काही दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे घोडबंदर रस्त्यावरील खड्डे अधिक मोठे झाले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीचा ठाणेकरांना सामना करावा लागत आहे. याचीच दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाच्या विश्रांतीनंतर गुरुवारपासून रस्ते दुरुस्तीला सुरुवात केली. याच कामाची अधिकाऱ्यांसमवेत ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी गुरुवारी संध्याकाळी पाहणी केली.
वाहतूककोंडीसंदर्भात विचारे यांनी ठाणे महापालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तसेच पोलीस आयुक्त आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्याशी संपर्क साधून संवाद साधून उपाययोजना करण्यास सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने चेना ब्रिज ते कापूरबावडी या ठिकाणी खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले असून, ते येत्या तीन दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे.