लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अंबरनाथमधील कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाला लागून असलेल्या मुख्य नाल्याची पाहणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी केली. या नाल्याची स्वच्छता न केल्याने त्याचा थेट परिणाम रस्त्यावर होत आहे. पाऊस पडल्यावर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहनचालकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या नाल्याची पाहणी खासदारांनी केली. यावेळी नाल्यातील साचलेला गाळ पाहिल्यावर मुख्य समस्या खासदारांच्या लक्षात आली. या ठिकाणी खाजगी कंपनीने थेट नालाच वळवल्याने पाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. अंबरनाथ पोलीस ठाणे ते विम्को नाका या रस्त्याच्या समांतर असलेला नाला शेजारील कंपन्यांनी परस्पर वळवल्याने पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. या नाल्यातील गाळही काढलेला नाही. त्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर आणि शेजारील घरात शिरते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी खासदार शिंदे यांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह या नाल्याची पाहणी केली. त्यानंतर या समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश पालिका प्रशासनाला आणि तहसीलदारांना देण्यात आले. कारखानदारांनी जे नाल्यात अतिक्रमण केले आहे त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नाल्याची पाहणी करत असताना नाल्यात बेकायदा स्लॅब टाकून अतिक्रमण केल्याचे आणि नाल्यातील साचलेला गाळ याचे दर्शन खासदारांना झाले. त्यामुळे त्या संदर्भात योग्य कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.
खासदारांनी केली नाल्याची पाहणी
By admin | Published: June 23, 2017 5:44 AM