लोकमत न्यूज नेटवर्क
स्नेहा पावसकर
ठाणे - एमपीएससीच्या परीक्षांची तारीख सातत्याने पुढे ढकलण्यात येत असल्याने परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी परीक्षा कधी होणार? होणार की नाही? तोपर्यंत वय तर उलटून जाणार नाही ना, अशा विविध कारणांनी गाेंधळात सापडले आहेत.
कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या. काही पुढे ढकलल्या जात आहेत. राज्य लाेकसेवा आयोगानेही राज्यसेवा पूर्व परीक्षा अर्थात एमपीएससीची परीक्षा सतत तीन ते चारवेळा पुढे ढकलली. नंतर विद्यार्थ्यांनी मार्च महिन्यात आंदोलन केले. तर यापूर्वी घेतलेल्या काही परीक्षांचा निकालही कोरोनाचे कारण देत जाहीर झालेला नाही. काही नियुक्त्या रखडलेल्या आहेत, अशा कारणांनी एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी चिंताग्रस्त झाले आहेत. परीक्षा कधी होणार? झाल्या तर निकाल कधी लागणार आणि नोकऱ्या कधी मिळणार? अजून किती वर्ष आम्ही बेरोजगार राहायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
------------
मी गेल्या चार वर्षांपासून परीक्षेची तयारी करत आहे. पण, गेले वर्ष आणि यंदाचे वर्षही वाया गेले असेच वाटते. परीक्षेच्या तारखाच जाहीर होत नाही, याच्यापुढे कधी परीक्षा देऊन अपेक्षित यश मिळणार आणि कधी नोकऱ्या मिळणार काय माहीत? आमचे आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीनेही मोठे नुकसान होते आहे. सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा.
समीरा रोडे, विद्यार्थिनी
-----------
आम्ही परीक्षांची तयारी करून परीक्षेची वाट पाहतोय. अजून किती परीक्षा पुढे ढकलणार आणि त्यानंतर इतर सर्व प्रक्रिया असते. त्यात अजून किती वर्षे जातील, माहीत नाही. तोपर्यंत आमची वयोमर्यादा उलटून गेली, तर त्याला जबाबदार कोण? त्यातच आम्ही अभ्यासासाठी क्लास लावतो. पण, कोरोनामुळे ते क्लासही ऑनलाइन आहेत. ते क्लास तरी ऑफलाइन घेण्यास परवानगी शासनाने द्यावी.
प्रियांशू नाईकपाटील, विद्यार्थी
-----------
ऑफलाइन क्लासेसना परवानगी नाही, त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवताना मर्यादा येतात. बाजारात बहुतांश दुकाने उघडी आहेत. त्यातून कोरोना पसरत नाही, पण क्लासेस सुरू केले तर कोरोना पसरण्याची भीती आहे, हा काही शासनाचा विचार कळतच नाही. यामुळे आमचे तर नुकसान होतेच, पण विद्यार्थ्यांचेही नुकसान होते आहे, अशी भूमिका स्पर्धा परीक्षेचे क्लास घेणाऱ्या काही चालकांनी मांडली.