डोंबिवली – हजारो गरीब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि शिवसेना नगरसेवकांच्या मागणीनुसार येत्या महिन्याभरात एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधा सुरू होणार आहे. अत्यंत अद्ययावत अशा या वैद्यकीय उपकरणांमुळे रोगनिदानाची अचूकता वाढणार आहे. तसेच, या महागड्या वैद्यकीय सेवा गरीब रुग्णांना अत्यल्प दरात मिळणार आहेत.
पीपीपी तत्त्वावर एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध होणार असून ठाणे महापालिकेने त्यासाठी कृष्णा डायग्नोस्टिक सेंटरशी करार केला आहे. १९९२ पासून ठाणेकरांच्या सेवेत असलेल्या या रुग्णालयात आयसीयू, अपघातावरील उपचार, अस्थिव्यंग, नेत्रचिकित्सा अशा विविध उपचारांच्या सोयी असून अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स आणि १००हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर रुग्णसेवेसाठी उपलब्ध आहेत. परंतु, येथे एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची परवड होत होती. त्यांना खासगी रुग्णालयात महागड्या दराने ही सेवा घ्यावी लागत होती किंवा मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागत होती.
त्यामुळे रुग्णांची ही अडचण दूर करण्यासाठी खा. डॉ. शिंदे प्रयत्नशील होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी त्यांनी चर्चा करून येथे पीपीपी तत्त्वावर ही सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता महिन्याभरात ही सेवा उपलब्ध होणार आहे. रुग्णालयात तळ मजल्यावर रेडिऑलॉजी विभागाच्या बाजूलाच एमआरआय आणि सिटी स्कॅन कक्ष असणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ही उपकरणे असून अशा प्रकारची ठाण्यातली पहिलीच उपकरणे असणार आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या अत्यल्प शुल्क आकारणीत रुग्णांना ही सेवा उपलब्ध होणार आहे.
यामुळे रुग्णांची मोठी अडचण दूर होणार असल्याची भावना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. या मागणीला उचलून धरणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे,महापौर मीनाक्षी शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल आणि अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांचेही त्यांनी आभार मानले.