- राजू काळे, भार्इंदरमीरा रोडच्या कनाकिया परिसरात सीआरझेडबाधित क्षेत्रावर बेकायदेशीर मातीभराव केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पालिका प्रभाग समिती क्र. ६ चे अधिकारी दिलीप जगदाळे यांनी मीरा रोड पोलिसांत ६ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वा.च्या सुमारास २९ जणांवर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातून एका स्थानिक बड्या राजकीय नेत्याला बगल दिल्याने पर्यावरणवाद्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असली तरी काही बड्या बिल्डरांवर मात्र गुन्हा दाखल केला आहे. केंद्र शासनाद्वारे २००० मध्ये लागू झालेल्या सीआरझेड आराखड्याला त्या वेळच्या पालिका अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे शहराचा सुमारे ४० टक्के भूभाग सीआरझेडबाधित झाला आहे. त्यातून पालिका मुख्यालयदेखील सुटले नसल्याने त्याचे विस्तारीकरण पर्यावरण विभागाच्या लालफितीत अडकले आहे. सीआरझेडखेरीज उर्वरित भूभागावर बांधकामे झाल्याने विकासक व जमीनमालक सीआरझेड क्षेत्रावर लक्ष केंद्रित करू लागले आहेत. याला राज्याचा महसूल विभाग जितका कारणीभूत आहे, तितकेच स्थानिक पोलीस व प्रशासनही जबाबदार आहे. सीआरझेडबाधित क्षेत्रात असलेले तिवर क्षेत्र नष्ट करून तेथे बेकायदेशीर मातीभराव केल्याच्या तक्रारींविरोधात महसूल विभाग केवळ कागदी घोडे नाचवून कर्तव्य पार पाडत आहे. त्यामुळे निगरगट्ट झालेले भूमाफिया खुलेआम आपले बेकायदेशीर अतिक्रमण सुरूच ठेवत आहेत. जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी प्राप्त तक्रारीनुसार कनाकिया परिसराची नुकतीच पाहणी केली होती. त्या वेळी प्रांताधिकारी परदेशी, आयुक्त अच्युत हांगे, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत सुमारे २ लाख चौरस फुटांहून अधिक सीआरझेडबाधित क्षेत्रावर बेकायदेशीर मातीभराव केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी जमिनीच्या सातबाऱ्यावर नोंदीत व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या वेळी मीरा रोड पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलून काही व्यक्तींसह डम्पर ताब्यात घेतले होते. त्यानंतर, पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार प्रभाग अधिकारी जगदाळे यांनी ५ आॅक्टोबर रोजी जागेची पाहणी करून २९ जणांवर ६ आॅक्टोबर रोजी एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
२९ जणांवर एमआरटीपी दाखल
By admin | Published: October 08, 2015 12:17 AM