शहापूर : मागील काही दिवसांपासून तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी वीजवाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले. यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून महावितरणचे १५ लाखांचे नुकसान झाले, अशी माहिती उपविभागीय अभियंता अविनाश कटकवार यांनी दिली.मुंबईला पाणीपुरवठा करणाºया भातसा, मोडकसागर धरणांत वाढ झाली आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे चेरपोली, कळंभे, गोठेघर, आसनगाव, खर्डी, वैतरणा, अघई, आटगाव, शेणवा, कसारा, चेरपोली येथे वाहिन्यांवर झाडे पडल्याने अनेक ठिकाणी खांब उखडले आहेत. खर्डी विभागात काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून पडल्या होत्या, तर एक ठिकाणी ब्रेकर बंद पडल्याने वैतरणा वाहिनी बंद झाली होती. परंतु, कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करून पुरवठा सुरळीत केला. वासिंद पश्चिमेकडे शिवाजीनगरमध्ये एक झाड पडल्याने विजेच्या तारा आणि एक खांब कोलमडून पडला. खांब उचलण्याचे काम सुरू आहे.- शेणवा विभागातही काही ठिकाणी वीजवाहिन्यांवर फांद्या पडल्या आहेत, तर एका ठिकाणी विजेचा खांब एका बाजूला झुकला आहे. त्यामुळे वीजपुरवठा अनियमितपणे सुरू आहे. शहापूर दिवाणी न्यायालय परिसर, चेरपोली, कळंभे, गोठेघर, आसनगाव, खर्डी, वैतरणा, अघई, आटगाव, शेणवा, कसारा, चेरपोली येथेही झाडे उन्मळून पडली. शहापूरमध्ये वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
पावसामुळे महावितरणचे १५ लाखांचे नुकसाने, कर्मचाऱ्यांचे युद्धपातळीवर काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 12:15 AM