डोंबिवली : गेल्या दहा महिन्यांपासून वीजबिल भरणा टाळणाऱ्या ग्राहकांना बिल भरण्याची विनंती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्याच्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कर्तव्यावरील वीज कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे हा फौजदारी गुन्हा असून, ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
सहायक अभियंता वैभव कांबळे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांना उंबर्डे गावातील दत्त मंदिर परिसरातील ज्ञानेश्वर भोईर या ग्राहकाने धमकावल्याची घटना बुधवारी घडली. वीज मीटरला धक्का लावल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भोईर याच्याविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच बदलापूर पूर्व उपविभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ इंदल राठोड यांना दमदाटी व कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिरगाव येथील अमृत अहिरे याच्याविरुद्ध बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.