ठाणे : गणेशोत्सवाच्या काळात चोरुन वीज वापरण्याचे प्रमाण वाढू लागल्याने ते रोखण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. अनधिकृत वीज वापरणा-यांवर दामिनी पथकाची करडी नजर रोखली जाणार आहे. तसेच अधिकृत वीजजोडणी घेऊन गणेश मंडळांनी निर्विघ्नपणे हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र महावितरणच्या वीज दरात एक रुपयांची वाढ केली आहे.गणेशोत्सवाच्या काळात गेल्या काही वर्षात अनधिकृतपणे वीजजोडणी घेऊन उत्सव साजरा केला जात असल्याचे प्रमाण वाढले होते. त्याला आळा बसावा यासाठी महावितरणने दामिनी या विशेष पथकाची निर्मिती करुन त्याद्वारे चोरुन वीज वापरणाºयांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या पथकात कार्यकारी अभियंत्याबरोबर अन्य चार ते पाच कर्मचारी काम करीत असून हे पथक गणेशोत्सवाच्या काळात अचानकपणे गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी जाऊन तेथे चोरुन वीज वापरली जात असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे काम करत आहे. तसेच दुसरीकडे अधिकृत कनेक्शन देण्याचे काम सुद्धा महावितरणकडून केले जात आहे.महावितरणच्या या पावालामुळे २०११ पासून ठाण्यासह विविध भागातील गणेश मंडळांनी स्वत:हून पुढे येऊन अधिकृत जोडणी घेणे सुरु केले आहे. आकडे टाकून तसेच अनधिकृत वीज घेण्याच्या प्रकारामुळे अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे गणेश मंडळांनी आॅनलाईन अथवा आपापल्या परिसरातील महावितरणच्या कार्यालयात जाऊन हंगामी स्वरुपाच्या वीजजोडणीसाठी अर्ज करुन ती घेऊन उत्सव साजरा करावा, असे आवाहन भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी केले आहे. तसेच चोरुन वीजपुरवठा घेणाºयांवर दामिनी पथकाची करडी नजर राहणार असून दोषी मंडळांवर वीज कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.दरम्यान, महावितरणने मागील वर्षी वीज मंडळांसाठी ३.२६ रुपये दराने वीजजोडणी दिली होती. यंदा मात्र त्यात १.०५ रुपयांची वाढ केली आहे. परंतु घरगुती वापराच्या दराएवढाच साधारणपणे हा दर असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. त्यानुसार यंदा ४.३१ रुपये असा ठेवला आहे.अशी मिळेल जोडणी..तात्पुरता वीजपुरवठा घेण्यासाठी मंडळांनी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावरुन नवीन वीजजोडणीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल करावेत. या अर्जासोबत आवश्यकतेनुसार स्थानिक सक्षम अधिकारी अथवा पोलीस अधिकाºयांचे नाहरकत प्रमाणपत्र व वीजजोडणीचा चाचणी अहवाल देणे गरजेचे आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व रकमेचा भरणा केल्यानंतर तत्काळ वीजजोडणी मंजूर केली जाईल, असे महावितरणे स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सवासाठी महावितरण देणार तात्पुरती वीजजोडणी, मागील वर्षीच्या तुलनेत दरात एक रुपयाची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 3:51 AM