लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळातील ७० हजार ६८६ वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १०५ कोटी रुपये वीजबिल थकीत असून, चालू वीज बिलासह थकबाकी व पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत होणार असल्याचे सांगण्यात आले. याव्यतिरिक्त परिमंडळातील ७ लाख ८३ हजार ग्राहकांकडे मार्च २०२१ पर्यंतची ४०२ कोटी, तसेच एप्रिल ते जून २०२१ या तीन महिन्यांची थकबाकी १४२ कोटी आहे. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट असून, ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.
कल्याण मंडळ कार्यालय १ मधील कल्याण, डोंबिवलीतील ८ हजार ७७१ ग्राहकांचे ७ कोटी ७ लाख रुपये थकले आहेत. ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग व उल्हासनगरचा समावेश असलेल्या कल्याण मंडळ कार्यालय २ अंतर्गत १४ हजार ९२३ ग्राहकांचे ४९ कोटी थकीत आहेत. वसई मंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या वसई व विरारमधील सर्वाधिक २७ हजार ५२७ ग्राहकांचे २८ कोटी ३३ लाख आणि पालघर मंडळात १९ हजार ४६५ ग्राहकांचे २० कोटी ७४ लाख रुपये थकीत असल्याने वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला आहे. या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर २०२० पासून वीजबिलाचा एक रुपयाही भरलेला नाही. त्यामुळे नाइलाजास्तव त्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
... तर होणार कारवाई
थकीत वीज बिलापोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिल व पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही. शेजाऱ्यांकडून अथवा चोरट्या मार्गाने वीजपुरवठा घेणे धोकादायक असून, यात वीज देणाऱ्या व घेणाऱ्या दोघांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे अधिकृतपणे वीज वापर करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी वीज ग्राहकांना केले आहे.
-----