डोंबिवली : तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणच्या कल्याण परिमंडळातील वीज वितरण यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार वीज वितरण यंत्रणेचे सुमारे तीन कोटींचे नुकसान झाले आहे, तर वादळामुळे वीजपुरवठा बाधित झालेल्या १३ लाख ३० हजारांपैकी ११ लाख तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी सकाळपर्यंत सुरळीत करण्यात आला आहे.
चक्रीवादळामुळे ५४ उपकेंद्रे, ४०५ वीजवाहिन्या, सात हजार ३४३ वितरण रोहित्र नादुरुस्त झाले. ११३३ गावांचा व सर्व वर्गवारीतील १३ लाख २९ हजार ९१४ ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. उच्चदाब वाहिन्यांचे २३४, तर लघुदाब वाहिन्यांचे ३०२ विजेचे खांब कोसळले किंवा वाकले. वादळी वारा आणि पाऊस सुरू असताना कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले. विपरीत परिस्थितीत अव्याहत काम करून ४५ उपकेंद्रे, ३१३ वीजवाहिन्या, चार हजार ३९७ वितरण रोहित्र दुरुस्त करून ११ लाख २ हजार ७५१ ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी सकाळपर्यंत पूर्ववत करण्यात आला. उच्चदाब वाहिनीचे ६२ व लघुदाब वाहिनीचे ८६ वीजखांब नव्याने उभारण्यात आले. वीजवाहिन्यांवर वृक्ष उन्मळून पडणे, झाडाच्या फांद्या पडणे, लोखंडी पत्रे, फ्लेक्स व त्यासाठीचा सांगाडा पडणे यातून मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या आहेत. उर्वरित सुमारे दाेन लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी, अभियंते, कंत्राटदारांचे कामगार कार्यरत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दुधभाते यांनी दिली.
---------------
मंडळनिहाय वीज ग्राहकांची आकडेवारी
कल्याण मंडळ एक अंतर्गत बाधित झालेल्या सर्वच चार लाख ७५ हजार २५१ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. कल्याण मंडळ दोन अंतर्गत दाेन लाख ६५ हजार ७२९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी दाेन लाख ५८ हजार १९८ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
---------------
वसई मंडळातील वसई व विरार विभागात दाेन लाख ३९ हजार ५४१ ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. त्यातील दाेन लाख १३ हजार ६८२ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या पालघर मंडळात तीन लाख ४९ हजार ३९३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातील दाेन लाख १३ हजार ६८२ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.