उल्हासनगर- शहर विकास आराखडा झोपडपट्टीवरून नांगर फिरवणार व बिल्डरधार्जिना आहे. असा आरोप मनसेने करून शिवाजी चौकात दुपारी आराखड्याची होळी केली. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली.उल्हासनगर विकास आराखडा गेल्या महिन्याच्या शेवटी प्रसिद्ध झाला. आराखडा दोन विभागात प्रसिद्ध झाला. आराखड्यातील पहिल्या भागातील बदलासाठी, महासभेत प्रस्ताव आणावा लागणार असून प्रस्ताव बहुमतांनी मंजूर करून शासनाकडे पाठवावा लागणार आहे. तर दुसऱ्या भागासाठी हरकत व सूचना घेण्याचा अधिकार आहे. मात्र त्यासाठी कोकण विभाग संचालक नगररचनाकार यांच्याकडे हरकत घ्यावी लागणार आहे. आराखड्यातील पहिल्या अंतिम भागात आरक्षित भूखंड, खुले मैदान, बंद कंपन्या, मैदाने, उद्याने आदी ठिकाणी रहिवासी क्षेत्र दाखविले आहे. तर झोपडपट्टी, शाळा-महाविद्यालय, रस्ते आदी ठिकाणी हरितपट्टा दाखवून धनदांडगे व बिल्डरांचे हितसंबंध जपल्याची टीका शहरातून होत आहे.
शहर आराखड्याच्या दुसऱ्या भागात, 120 फुटाचा रीग रोड जात आहे. रिंग रोड 120 फुटाचा असून बहुतांश झोपडपट्टीवरून जात आहे. त्यामुळे हजारो नागरीक बेघर होणार आहे. तसेच कबरस्थान आरक्षित भूखंडा वरून हटवून सम्राट अशोकनगर येथील झोपडपट्टी व मराठी शाळेवर कबरस्थान टाकले. त्यामुळे झोपडपट्टी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्याला असंतोषाला वाचा फोडण्यासाठी, शनिवारी संघर्ष समिती व राजकीय पक्षांनी पालिका महासभेवर मोर्चाचे आयोजन केले आहे.
मनसेचे शहराध्यक्ष प्रदीप गोडसे, संजय घुगे, जिल्हाउपाध्यक्ष सचिन कदम, विध्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष मनोज शेलार, मेनुहिद्दीन शेख यांच्यासह शेकडो जणांनी दुपारी 12 वाजता शिवाजी चौकात एकत्र येऊन विकास आराखड्याची होळी केली.