ठाणे : तीन वर्षांपूर्वी पावसामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर, उड्डाणपुलांवर खड्डेच खड्डे झाले होते. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिकेसह एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने या दोन्ही प्राधिकरणांच्या उड्डाणपुलांवरील खड्डे बुजविले होते. यासाठी १ कोटी ३८ लाखांचा खर्च करण्यात आला होता. हे बिल मिळावे म्हणून महापालिकेने संबंधित यंत्रणांशी वारंवार पत्रव्यवहार करुनही त्यांनी अद्याप बिल अदा केले नाही.
तीन वर्षांपूर्वी रस्त्यांवर एवढे खड्डे पडले होते की, महापालिकेवर चांगलीच टीकेची झोड उठली होती. एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या उड्डाणपुलांवरही खड्डेच खड्डे झाले होते. त्याचीही टीका महापालिकेला सहन करावी लागली होती. त्यामुळे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पालिकेच्या हद्दीतील रस्त्यांबरोबरच एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या उड्डाणपुलांवरील खड्डेही बुजविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एमएसआरडीसीच्या वाघबीळ येथील उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्यासाठी ७५ लाखांचा निधी खर्च केला होता. एमएमआरडीएच्या तीन हात नाका येथील उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्यासाठी ६३ लाखांचा निधी खर्च केला होता. हा खर्च नंतर मिळावा यासाठी महापालिकेने दोनही प्राधिकरणांना वारंवार पत्रव्यवहार केला. परंतु तीन वर्षे उलटूनही त्यांच्याकडून हा खर्च देण्यात आलेला नाही.
...............
संबंधित यंत्रणांना पुन्हा स्मरणपत्र पाठविले जाणार आहे. यापूर्वीदेखील पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु अद्यापही त्यांच्याकडून खर्च मिळालेला नाही. आता पुन्हा पत्रव्यवहार केला जाणार आहे.
(रवींद्र खडताळे, नगरअभियंता, ठामपा)