बदलापूर : मुरबाड तालुक्यातील एमआयडीसी भागाचा विकास होण्याऐवजी या औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे या उद्योगांना चालना देण्यासाठी उपाययोजना आखण्याची मागणी मुरबाड मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. या मागणीवर चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरबाडमधील उद्योगांना चालना देण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट केले.
मुरबाड तालुक्याच्या विकासासोबत उद्योग क्षेत्रात रोजगारनिर्मितीला मोठ्या प्रमाणात वाव आहे. मात्र, या ठिकाणी उद्योगवाढीसाठी कोणतेच प्रयत्न झाले नाही. उलट, उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अनेक उद्योग बंद पडत आहेत. पाच वर्षांत या उद्योगांच्या वाढीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, सरकारी पातळीवर याबाबत योग्य निर्णय झालेले नाही. त्यामुळे मुरबाडमधील कारखानदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत कारखानदारांनी मुख्यमंत्र्यांकडे ज्या प्रमुख मागण्या केल्या, त्यात मुरबाड औद्योगिक क्षेत्राला ‘ड’ प्लस दर्जा देण्यात यावा. पायाभूत आराखड्याला मंजुरी मिळावे. विजेचे दर कमी करावे. मुरबाड रेल्वेने जोडण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. सोबत, राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करतानाच त्यात मेट्रोचा समावेश करावा आणि मुरबाड येथे उड्डाणपुलास मंजुरी द्यावी आदी मागण्यांचा समावेश होता.
संघटनेचे अध्यक्ष दिनेश अग्रवाल, उपाध्यक्ष मुकेश उत्तमानी, नरेश खेतवानी, अविनाश पवार यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून या मागण्या मांडल्या. त्यातील विजेची समस्या आणि ड प्लस दर्जा देण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचे यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुरबाडमधील उद्योगांची अवस्था पाहता एमआयडीसीमध्ये ५६२ भूखंड असून त्यातील ५४१ भूखंडांचे वाटप झाले आहे. त्यापैकी २०० कारखाने सुरू असून ३४१ कारखाने विविध कारणांमुळे बंद पडले आहेत. याचा तपशील मुख्यमंत्र्यांना दिल्यावर या एमआयडीसीबाबत सकारात्मक कामे करण्याचे आणि निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या चर्चेच्या वेळेस पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे उपस्थित होते.