नालासोपारा : रुग्णवाहिकेतून चक्क गावठी दारूची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार वसई पूर्वेकडील मालजीपाडा गावात शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी वालीव पोलिसांनी रुग्णवाहिकेसह गावठी दारू जप्त करीत एकाला ताब्यात घेतले आहे.मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गावठी दारूची अवैधरीत्या वाहतूक सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांना मिळाली होती. त्यानुसार नाकाबंदी लावण्यात आली होती. शुक्र वारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक रुग्णवाहिका मालजीपाडा गावातून संशयास्पदरीत्या बाहेर पडताना साहाय्यक फौजदार नांदगावकर, पोलीस नाईक योगेश घुगे, बोडके, किरण वीरकर यांच्या पथकाला दिसली. या रुग्णवाहिकेची तपासणी केली असता, त्यात रुग्णाऐवजी ३ रबरी ट्यूब व ९ प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये ४८० लीटर गावठी दारू आढळली.या प्रकरणी पोलिसांनी चालक प्रेमनारायण रामधनी मौर्या (३५) याला ताब्यात घेतले आहे. त्याने ही दारू कोणाकडून घेतली आणि कोणाला देणार होता, याबाबत चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणी ४ लाख ३३ हजार ६०० रु पयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती, वालीव पोलिसांनी दिली.
नालासोपाऱ्यात रुग्णवाहिकेतून चक्क गावठी दारूची वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 12:28 AM