ठाणे : मागील सात ते आठ महिने आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन यंत्रणा कोरोनाशी लढा देत आहे. त्यात कोरोना या आजाराच्या लसीची अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा संपुष्टात येवून शनिवारी बहुचर्चित कोरोना लसीकरणच्या मोहिमेचा सर्वत्र प्रारंभ झाला. त्यानुसार ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी पहिली लस टोचून घेत, जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा पहिला लाभार्थी होण्याचा मान मिळविला आहे. शनिवारी सकाळी 11.00 वाजता ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी
जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, जिल्हा परिषद आरोग्य सभापती कुंदन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. गौरी राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. जळगावकर व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यातील 62 हजार 750 फ्रंट लाईन वर्करसाठी मकर मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला शासनाकडून 74 हजार कोरोनावरच्या लसी प्राप्त झाल्या. त्यात शनिवारी कोरोनावरील लसीकरण मोहिमेला जिल्ह्यातील सहा महापालिका दोन नगर परिषदा व ग्रामीण क्षेत्रातील 23 लसीकरण केंद्रांवर सुरुवात करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात 2 हजार 300 फ्रंट लाईन वर्कर्सला लस देण्यात येणार आहे. त्यानंतर शासनाकडून लसीकरणाबाबत ज्या प्रमाणे सूचना प्राप्त होतील, त्या प्रमाणे लसीकरण पुढे सुरु राहणार आहे.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात या मोहिमेच्या शुभारंभाच्या दिवशी पहिली लस टोचून घेत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी लसीकरणाचे पहिले लाभार्थी होण्याचा मान मिळविला. तसेच जिल्ह्यात रुग्णालयात लसीकरण करण्यात येणाऱ्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना घेण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर वेटिंग रूमसह एखाद्या वेळी लस टोचल्यानंतर काही रीएक्शन झाल्यास त्यासाठी विशेष काळजी घेत, अनेक बेड्स देखील आरक्षित करून ठेवले आहेत.
दरम्यान, ठाणे महानगर पालिकाप्रशासनाच्या वतीने देखील शनिवार पासून कोविड 19 लसीकरण मोहिमेला सुरूवात केली. घोडबंदर रोड येथील ठाणे महापालिकेच्या रोझा गार्डनिया या आरोग्यकेंद्रावर महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. रोझा गार्डनिया आरोग्यकेंद्रावर डॉ. वृषाली गौरवार यांना पहिली लस देवून या लसीकरणाचा ठाण्यात शुभारंभ करण्यात आला.
दरम्यान लसीकरणासाठी ज्या ज्या कर्मचारी किंवा आरोग्य कर्मचारी यांना लसीकरण करण्याबाबतचा संदेश येईल त्यांनीच निर्धारित केलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहायचे आहे, तरी नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन ठामपाने केले आहे. याप्रसंगी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, आरोग्य समिती सभापती निशा पाटील, स्थानिक नगरसेवक नरेश मणेरा, सिदधार्थ ओवळेकर आदि उपस्थित होते.
हा दिवस आंनदाबरोबर अभिमानाचा क्षण- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी
" जिल्ह्यात कोरोना लसीकरणास सुरू झाली आहे. हा आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे. विशेष आंनद असा की मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ही लस मेडिकल कर्मचारी, डॉक्टर,नर्स यांच्यापासून सुरुवात झाली आहे. त्यात, सर्वात प्रथम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलाश पवार यांनी ही लस घेऊन सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यासमोर एक उत्तम उदाहरण ठेवले आहे.
लस सुरक्षित - डॉ. कैलास पवार
जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेच्या शुभारंभी पहिली लस टोचून घेण्याच्या मला मान मिळाला. तसेच मला लस घेतल्यानंतर काही त्रास झाला नाही. मी जिल्ह्यातील पहिली लस घेतल्याचा मला अभिमान आहे. तसेच हि लस पूर्णतः सुरक्षित आहे.
तीन केंद्रांवर तांत्रिक बिघाड
देशात एकाच वेळी सुरू झालेल्या लसीकरणामुळे लाभार्थ्यांची नोंदणी केलेल्या पोर्टलवर अतिरिक्त ताण आला . त्यामुळे ठाणे सामान्य रुग्णालयासह केडीएमसी आणि उल्हासनगर येथील केंद्रांवर लसीकरणास उशीर झाला. हळूहळू हे केंद्र सुरू होण्यास सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
सर्वांनी लसीचे स्वागत करूया- डॉ. वृषाली गौरवार
लसीबाबत मनात गैरसमज ठेवू नका. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाही, कोरोनातून मुक्त करण्यासाठी ही लस उपयोगी ठरणार असून आपण सर्वानी लसीचे स्वागत करुया.
ही निश्चित आंनदाची बाब – नरेश म्हस्के, महापौर, ठामपा
कोरोना संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. गेल्या 10 महिन्यापासून कोरोनाशी सामना करताना अनेकांनी प्राण गमावले, त्यांची आठवण आज होणे स्वाभाविक आहे. परंतु अखेर आज लसीकरणास सुरूवात झाली ही निश्चितच
अफवांवर विश्वास ठेवू नये- डॉ. विपिन शर्मा, आयुक्त, ठामपा.
शासनाच्या सूचनानुसार आज कोविशिल्ड या लसीकरणास ठाण्यात सुरूवात केली आहे. ठाण्यात 19 हजार लसींचा साठा करण्यात आलेला आलेला आहे. सुरूवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार असून शासनाच्या सूचनांनुसार पालन केले जाणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या लसीचे कोणतेही दुष्पपरिणाम नाहीत. लवकरच 28 केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात येणार शासनाच्या सूचनेप्रमाणे लवकरच ही केंद्रे कार्यान्वित करण्यात येतील.