भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या प्रभाग पाचच्या अंतर्गत असलेल्या व निजामपूर पोलीस ठाणे व मीनाताई ठाकरे रंगायतनच्या पाठीमागे असलेल्या भाजी मार्केटच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून या मार्केटच्या रस्त्यावर चिखल व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि चिखलातून मार्ग काढूनच महिला व नागरिकांना भाजीखरेदी करावी लागत आहे.
भिवंडी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या या भाजी मार्केटची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. हा भाग सखल असल्याने पावसाळ्यात या भागात नेहमीच पाणी साचते. पावसाचे पाणी आणि रस्त्यावरील सांडपाणी याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने या भाजी मार्केटमध्ये पावसाळ्यात नेहमी चिखल साचत असतो. तर, दुसरीकडे सखल भाग असल्याच्या बाता करत महापालिका अधिकारी या भाजी मार्केटच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. हे भाजी मार्केट भिवंडीतील महत्त्वाचे असून ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील महिला व नागरिक भाजी विकण्यासाठी तसेच खरेदी करण्यासाठी या भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, या भाजी खरेदीविक्र ी करणाऱ्या महिला व नागरिकांसाठी महापालिका प्रशासन कोणतीही सुविधा पुरवताना दिसत नाही. मार्केटच्या दुरवस्थेमुळे येथील भाजीविक्रेते पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. तर, चिखल, घाण तुडवत भाजीखरेदी करताना महिलांसह नागरिकांच्या अंगावर बाजूने जाणाºया वाहनांमुळे चिखल उडत असल्याने भाजीखरेदी करण्यासाठी आलेल्या महिला व नागरिकही पालिका प्रशासनाविरोधात नाक मुरडताना दिसतात. याबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी करूनही महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पालिका प्रशासनाने तातडीने येथे कार्यवाही करावी अशी मागणी नागरिक, विक्रेत्यांकडून केली जात आहे. चिखलातून चालणेही ग्राहकांना कठीण झाले आहे.
जेसीबीने चिखल उचलतोदरम्यान, या भाजी मार्केटचा भाग सखल असल्याने या भागात नेहमी पाणी साचते व चिखल साचतो. हा चिखल जेसीबीच्या मदतीने काढण्यात येतो, अशी प्रतिक्रि या भिवंडी महापालिकेच्या प्रभाग पाचचे प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे यांनी दिली आहे.