डोंबिवली : वाहतूक नियंत्रण विभागाचा सुरक्षा सप्ताह सुरू असतानाही शहरात ठिकठिकाणी कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान, कोंडी फुटत नसल्याने हा सप्ताह नेमका कशासाठी आहे, असा सवाल वाहनचालकांकडून होत आहे. शहरातील इंदिरा गांधी चौक, बाजीप्रभू चौक, फडके रोड, केळकर रोड, चिपळूणकर रोड, मानपाडा रस्त्यावरील चाररस्ता, शिरोडकर हॉस्पिटल, गावदेवी मंदिर परिसर, स्टार कॉलनी, शिवाजी उद्योगनगर, शनी मंदिर चौकात कोंडी होत आहे. त्याचबरोबर ठाकुर्ली रेल्वे फाटक, बँक परिसर, हनुमान मंदिर परिसर तसेच एमआयडीसी भागासह पश्चिमेला दीनदयाळ रोड आणि कोपर भागात, उड्डाणपूल आदी ठिकाणी होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी तर त्याचा फटका अधिक बसतो, असे राजाजी पथ येथील रहिवासी हेमंत गोलतकर, टाटा पॉवर लेनजवळील रहिवासी हेमंत दातार यांनी सांगितले.शहरात ठिकठिकाणी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांमुळे कोंडीत वाढ होते. रेती वाहून नेणारे ट्रक, अन्य वाहने ठिकठिकाणी रस्ते अडवतात. त्यात स्कूल बस, केडीएमटीच्या बस, अत्यावश्यक सेवा भरडल्या जातात. (प्रतिनिधी)
कोंडी फुटता फुटेना
By admin | Published: January 11, 2017 7:09 AM