- पंकज रोडेकर, ठाणे
कॅलेंडरची पाने एकामागून एक उलटल्यानंतरही मुकी असलेली मुलगी मिळत नसल्याने ती परतेल, याची आशा सोडणाऱ्या चव्हाण कु टुंबीयांचा आनंद होळीच्या दिवशी द्विगुणीत झाला. त्यांच्या या आनंदात खऱ्या अर्थाने ठाणे शहर पोलिसांनी रंग भरण्याचे काम केल्यानेच त्यांची मुलगी अंजली स्वगृही परतली. विशेष म्हणजे ती स्वगृही परतण्यापूर्वी आपण घरी जाणारच, या तिच्या तगाद्याने अखेर नियतीही तिच्या इच्छाशक्तीपुढे नतमस्तक झाल्याचे दिसते.वाहनचालक असलेले दिगंबर चव्हाण हे पत्नी, दोन मुले आणि दोन मुलींसह अंबरनाथ आणि बदलापूरच्या मधोमध असलेल्या फॉरेस्टनाका परिसरात वास्तव्यास आहे. हे कुटुंंब हातावर पोट भरून आपला उदरनिर्वाह करीत आहे. याचदरम्यान, त्यांची तीन नंबरची मुकी असलेली मुलगी अंजली ही १८ डिसेंबर २०१५ रोजी बेपत्ता झाली. ती मुकी असल्याने कुटुंब चिंतेत आल्याने त्यांनी अखेर १९ डिसेंबर रोजी अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेऊन ती हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर, एकेक दिवस करीत कॅलेंडरची पाने उलटू लागली होती. तर, पोलीस ठाण्यात विचारपूस केल्यावर ती मिळाल्यावर आम्ही कळवूच, अशी उत्तरे त्यांना नित्याची झाली होती. त्यातूनच त्यांनी ती मिळेल, याची आशा सोडून दिली. याचदरम्यान, दिगंबर चव्हाण यांना कोणीतरी ठाणे शहर सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी नुकतीच सहपोलीस आयुक्तांची भेट घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तत्काळ ठाणे शहर चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला अंजलीचा शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी.बी.राणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बी.व्ही.शिंदे, पोलीस हवालदार एम.एच.निकम, बी.बी.शिंगारे,छाया गोसावी हे पथक तिच्या शोध मोहिमेस लागले. त्याचदरम्यान,या पथकाला मुंबईतील डोंगरी बालसुधारगृहात एक मुकी मुलगी असल्याची माहिती मिळाली. तातडीने पथकाने तेथे धाव घेतली. पण, ती मुकी असल्याने पथकाला विचारपूस करणे काही कठीण झाले. त्यातच ती आपले नाव कधी पूजा तर कधी अनिता असे लिहून दाखवत होती. त्यामुळे पेच वाढू लागले. पण, हार न मानणाऱ्या त्या पथकाने तिचे फोटो घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हा तिची ओळख पटली.याचदरम्यान, १०० दिवसांचा कालावधी हा... हा... म्हणता निघून गेला होता आणि मुलगी होळीच्या दिवशी स्वगृही आल्याने कुटुंबीयांनी डोळ्यांतील आनंदाला अश्रंूद्वारे वाट मोकळी करून पोलिसांचे आभार मानले.तिची घरी येण्याची प्रबळ इच्छा...घरी जाण्यापूर्वी अंजली आपण घरी जाणार, असे तीन दिवस आपल्या हातवारे करून त्या बालसुधारगृहात सांगत होती. तिचीच घरची ओढ आणि असलेल्या प्रबळ इच्छाशक्तीने ती परतली आहे. जर का अजून दोन दिवस उशीर झाला असता तर तिला कर्नाटक येथील बालसुधारगृहात हलवण्यात येणार होते, असे सूत्रांनी सांगितले.